पणजी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी मागील पाच दिवसात मिठाईच्या दुकानांवर छापे मारुन ३२ नमुने तपासणीसाठी घेतले. मडगांव, पणजी, ताळगांव व करंझाळे येथे छापे मारुन मिठाईचे नमुने घेण्यात आले. शिवाय फळांच्या बाबतीत २४ तर भाज्यांच्या बाबतीत २ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. एकूण ५८ नमुने तपासणीसाठी घेतले.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. मंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार तपासणीसाठी वापरण्यात येत असलेले उपकरण ग्राहकाभिमुख आहे आणि फोंडा येथे अधिकृत स्टॉकिस्टकडे उपलब्ध आहे. आतापर्यंत तपासणी फक्त अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचा-यांकडूनच तसेच अन्य खात्याच्या कर्मचा-यांकडून केली जाते.
दुसरीकडे मासळीतील फोर्मेलिन रसायनाचा अंश शोधण्यासाठी कोचि येथील आयसीएआरच्या सेंट्रल इन्स्टिट्युट आॅफ फिशरीज टेक्नॉलॉजीने विकसित केलेले कीट एफडीएने आणले आहे ते बेभरंवशाचे असल्याचा दावा एका जागरुक नागरिकाने केला आहे त्यावर मंत्री राणे यांनी असा दावा केला आहे की,‘कोचि येथील सीआयएफटीने हे उपकरण विकसित केले आहे आणि एफएसएसआयकृत ते प्रमाणित आहे. सीआयएफटीने हायमीडिया कंपनीला उत्पादन व मार्केटिंगसाठी परवाना दिलेला आहे.
एफएसएसआयने देशभरात चाचणीसाठी प्रमाणित केलेले हे एकमेव उपकरण आहे. मासळीमधील अतिरिक्त फॉर्मेलडिहाइड या उपकरणातून तपासता येते. याशिवाय मासळीमधील अमोनियाचा अंश तपासण्यासाठीही सीआयएफटीने अन्य एक उपकरण विकसित केले आहे. पाच हजारपेक्षा अधिक नमुन्यांच्या तपासणीसाठी या उपकरणाचा वापर करण्यात आला असून सर्व चाचण्या संमत झालेल्या आहेत.
मासळीच्या बाबतीत यापुढे चेक नाक्यांवर आकस्मिक तपासणी केली जाईल तसेच मासळी बाजार, रेस्टॉरण्ट आदींची तपासणीही कामकाजाच्या दिवशी केली जाईल.
मासळीमध्ये नैसर्गिकरित्या उपजतच काही प्रमाणात फोर्मेलिनचा अंश असतो. सोसायटी आॅफ फिशरीज टेक्नॉलॉजी (इंडिया) या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार समुद्रातील मासळीत किलोमागे २.३८ मिलिग्रॅम तसे २.९५ मिलिग्रॅम आणि शिंपल्यांमध्ये किलोमागे 0.३३ मिलिग्रॅम ते १६ मिलिग्रॅम फोर्मेंलडिहाइडचा अंश असतो.
पकडलेल्या ताज्या मासळीमध्ये किलोमागे १.४५ मिलिग्रॅम ते २.६ मिलिग्रॅम फोर्मेंलडिहाइडचा अंश सापडतो, असे इंटरनॅशनल जर्नल आॅफ फिशरीज अॅण्ड अॅक्वेटिक स्टडीज या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात म्हटले असल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिका-यांचे म्हणणे आहे.