- किशोर कुबल पणजी - एनडीए आघाडीतील गोव्यातील घटक पक्ष मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी खाणबंदीला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. रेल्वे दुपदरीकरणाचा डीपीआर २०१२ पूर्वी मंजूर करण्यात आला त्यावेळी संपुआ सरकार केंद्रात होते. म्हादई प्रश्नालाही काँग्रेसच जबाबदार आहे, अशी टीका ढवळीकर यांनी केली. खाण व्यवसायात अराजकता कोणी आणली याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल. २००८ साली ३८ दशलक्ष टन उत्खनन मर्यादा होती ती ६२ दशलक्ष टनांवर कोणी नेली? कोण, कोण मंत्री या धंद्यात होते, ते स्पष्ट व्हायला हवे., ढवळीकर म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला. अमित शहा यांची म्हापशातील सभा ३ रोजी निश्चित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा म्हापसा येथे येत्या ३ रोजी सायंकाळी ५ वाजता आंतरराज्य बस स्थानकावर होणार आहे. तसेच त्याच्या आदल्या दिवशी २ रोजी फोंड्यातही जाहीर सभा होईल. फोंड्यातील सभेला स्थानिक नेते रवी नाईक, सुदिन ढवळीकर सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे हे चारही मंत्री व स्थानिक नेते उपस्थित असतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत एनडीएतील सर्व घटक मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार आंतोन वास, भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा समन्वयक तथा माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.