- पंकज शेट्ये वास्को -आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन कोंन्सुवा चर्च मध्ये प्रार्थना सभेला जाताना वेर्णा महामार्गावरील कोंन्सुवा जंक्शन जवळ झालेल्या अपघातात ६१ वर्षीय फ्रांन्सीस्को डीसिल्वा यांचा जागीच अंत झाला. बेर्ले - वेळसांव येथील फ्रांन्सिस्को दुचाकीने कोंन्सुवा जंक्शनसमोर पोचल्यानंतर कोंन्सुवा गावात जाण्यासाठी वळण घेण्याचा प्रयत्न करताना मागून अन्य एका दुचाकीने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने फ्रांन्सिस्को रस्त्यावर पडून मालवाहू रिक्षा खाली येऊन मरण पावला.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.१२) सकाळी १० वाजता तो अपघात घडला. दर शुक्रवारी कोंन्सुवा चर्चमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते. त्या प्रार्थना सभेला उपस्थित राहण्यासाठी फ्रांन्सिस्को त्याचा मुलगा एरन डीसिल्वा (वय ३०) याला घेऊन दुचाकीवरून जात होता. वेर्णा महामार्गावरून फ्रांन्सिस्को दुचाकीने कोंन्सुवा जंक्शनसमोर पोचल्यानंतर त्यांने वळण घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा फ्रांन्सिस्को कोंन्सुवा गावात जाण्याकरीता वळण घेण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी मागून येणाऱ्या अन्य एका दुचाकीने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात फ्रांन्सिस्को आणि त्याचा मुलगा रस्त्यावर फेकले जाऊन फ्रांन्सिस्को वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या एका मालवाहू रिक्षाखाली आला. फ्रांन्सिस्को रिक्षाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. फ्रांन्सिस्को याचा मुलगा एरनच्या पायाला जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. एरनची प्रकृती ठीक असल्याची माहीती पोलीसांनी दिली. फ्रांन्सिस्कोच्या दुचाकीला धडक देणाऱ्या दुसऱ्या दुचाकी चालकाचे नाव सोमा गावस (वय ४०, रा: बिर्ला) असल्याची माहीती पोलीसांनी देऊन तो मूळ महाराष्ट्रा येथील असल्याचे सांगितले.
पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच पोलीसांनी मयत फ्रांन्सिस्को याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. वेर्णा पोलीस त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करित आहेत.
सुरक्षेसाठी त्वरित उचित पावले उचलणार: आमदार ॲथनी वासकोंन्सुवा जंक्शनजवळ अपघातात ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहीती कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. अपघात कशामुळे झाला त्याची माहीती त्यांनी यावेळी मिळवली. वेर्णा महामार्गावर असलेल्या कोंन्सुवा जंक्शनच्या दोन्ही भागातून वेळसाव - पाळी आणि नावता अशा दोन गावांचे अंतर्गत रस्ते जुळत असल्याची माहीती आमदार वास यांनी दिली. येथे यापूर्वी अनेक छोटेमोठे अपघात घडलेले असून अनेक वर्षापासून येथे लोकांच्या सुरक्षेसाठी गतीरोधक घालण्यात यावे अशी लोकांकडून मागणी होत आहे. आज येथे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने भविष्यात पुन्हा अशी घटना घडूनये यासाठी मी त्वरित उचित पावले उचलणार असल्याचे वास यांनी सांगितले. ह्या मार्गावर सुरक्षेसाठी एकतर गतीरोधक घालण्याकरीता अथवा ट्राफीक सिग्नल बसवण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.