Goa: खराब रस्त्याचे पर्यटनावर परिणाम- कळंगुट पंचायतीने व्यक्त केली चिंता
By काशिराम म्हांबरे | Published: September 30, 2023 01:05 PM2023-09-30T13:05:57+5:302023-09-30T13:06:55+5:30
Goa: कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.
- काशीराम म्हांबरे
म्हापसा - कळंगुट पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. रस्ते खराब असल्याने पर्यटक कळंगुटकडेपाठ फिरवली आहे. कमी होत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे इथल्या पर्यटन व्यवसायावर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कळंगुट पंचायतीने दिला आहे.
कळंगुट पंचायत मंडळाने सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिशदेत हा इशारा दिला आहे. यावेळी उपसरपंचा गीता परब तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.
सुमारे तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी नागरिकांच्या समस्यांवर तोडग्यासाठी म्हापसा शहरात जनता दरबार भरवला होता. त्यात खराब रस्त्यांचा मुद्या पंचायतीकडून उपस्थित करण्यात आलेला. मंत्र्यांनी खात्याच्या अभियंत्यांना तातडीने उपाय योजना हाती घेण्याचे आदेश दिलेले पण तीन महिन्यानंतर आजही त्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सिक्वेरांनी निदर्शनाला आणून दिले.
रस्ते पंचायत क्षेत्रातील असले तरी ते सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सरकारकडून केली जाते. खात्याच्या तसेच त्यातील अभियंत्यांच्या या निष्क्रियतेवर नागरिक लोक प्रतिनिधींना जबाबदार धरतात. उत्तर जाप लोकप्रतिनिधींना द्यावा लागतो . पंचायतीकडून दुरुस्ती हाती घेतल्यास मंडळा विरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. अशावेळी सरकारकडून त्यात हस्तक्षेप करून दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी सुचना सिक्वेरा यांनी केली.