Goa: मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, कदंब कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:31 PM2024-02-07T13:31:45+5:302024-02-07T13:32:11+5:30
Goa News: कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केेले आहे. जाेपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे
- नारायण गावस
पणजी - कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केेले आहे. जाेपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे आयटक या कामगार संघटनेचे सचिव कामगार नेते ॲड. सुहास नाईक यांनी सांगितले.
कदंब महामंडळाच्या कामगारांना पूर्वी १२ टक्के पीएफ मिळत हाेत हाेता तो आता महामंडळाने कमी केला आहे. महामंडळाने पूर्वीसारखा पीएफ द्यावा तसेच थकबाकी भरावी, त्याचप्रमाणे ३४ महिन्यांची कदंब कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे ती पूर्ण करावी, सातवा वेतन आयाेग लागू करावा. त्याचप्रमाणे कदंब महामंडळाच्या अनेक बसेस या जुन्या झाल्या आहेत त्यामुळे कदंब महामंडळाने कितीही आणखी २५० बसेस नवीन घेत त्या कदंब महामंडळाच्या चालक वाहकांच्या ताब्यात द्याव्यात. तसेच अन्य विविध विषय आहेत जे अजूनही महामंडळाने साेडविलेले नाहीत तेही लवकर सोडवावे, असेही ॲड. सुहास नाईक यांनी सांगितले.
कामगार नेेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले कदंब महामंडळाचे कर्मचारी गेली अनेक वर्षे विविध मागण्यांसाठी निदर्शने आंदोलने करतात पण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकवेळी कामगारांच्या मागण्या पूर्ण करणार असे आश्वासन त्यांच्याकडून दिले जाते पण ते पूर्ण केले जात नाही. अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. पण आता या मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुुरुच राहणार आहे, असे यावेळी ॲड. मंगेशकर म्हणाले.
बसेस सुरुच राहणार
प्रवाशांना कुठलीच अडचण भासू नये यासाठी राज्यातील कदंब बसेस बंद केल्या जाणार नाही पण आळीपाळीने या आंदाेलनात कदंबचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. कदंब बसेस बंद करुन विद्यार्थ्यांना कामगारांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही त्यामुळे सरकारने आमचा विचार करुन आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्यात, असे यावेळी या कर्मचाऱ्यांनी सांगितले.