Goa Lok Sabha Election 2024: पल्लवी धंपे की दामू नाईक? भाजपकडून दक्षिण गोव्यासाठी उमेदवाराची आज घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 09:27 AM2024-03-24T09:27:40+5:302024-03-24T09:28:58+5:30
Goa Lok Sabha Election 2024: पक्षाच्या केंद्रीय निवडणूक - समितीची बैठक काल, शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालली.
Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आज, रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पल्लवी यांच्याबरोबरच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामू नाईक यांचे नावही आता पुढे आले आहे.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक - समितीची बैठक काल, शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. दामू नाईक यांच्या नावावरही काल गंभीरपणे चर्चा झाली. त्यामुळे पल्लवी किंवा दामू या दोघांपैकी एकास तिकीट मिळू शकते, अशी माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली.
पल्लवी या पर्येच्या आमदार दिव्या राणे यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यांच्या रुपाने दक्षिण गोव्याला नवा चेहरा उमेदवार म्हणून मिळू शकतो. दामू नाईक हे केडरमधील असून गेली २५ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. संघटनात्मक कामासाठी संपूर्ण गोव्यात ते फिरलेले आहेत. दक्षिण गोव्यात त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. शिवाय भंडारी समाजाचे नेते असल्याने त्यांचा संपर्क आहे.
भाजपने उत्तर गोव्याचा उमेदवार पहिल्याच यादीत जाहीर केला होता. लोकसभेसाठी गोव्यातील मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील उमेदवार जाहीर करण्यास पक्षाकडून काहिसा विलंब झाला. असे असले तरी आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी उमेदवाराला पुरेसा वेळ मिळणार असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानी दक्षिण गोव्याचा उमेदवार आज रविवारी जाहीर केला जाईल, असे सांगितले.