गोवा : लुटीची वसूली प्रक्रिया खाण खात्याकडून सुरू, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सुचलं शहाणपण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:08 AM2018-02-16T10:08:06+5:302018-02-16T10:08:38+5:30
खाण घोटाळा प्रकरणात लुटीची वसुली करण्यासाठी गोवा खाण खात्याकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
वासुदेव पागी/ पणजी - खाण घोटाळा प्रकरणात लुटीची वसुली करण्यासाठी गोवा खाण खात्याकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. खात्याकडून पहिले प्रकरण हाती घेण्यात आले आहे ते बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटॉर्नी घेऊन उत्खनन करण्याच्या प्रकरणात एसआयटीकडून अटक करण्यात आलेला इम्रान खान याचे. सर्वोच्च न्यायालयाच्या वसुलीसंबंधी आदेशानंतर ही कारवाई सुरू झाली आहे.
खाण घोटाळा प्रकरणातील बहुतेक सर्व प्रकरणात एसआयटीने आरोपपत्रे दाखल केली असली तरी वसुलीच्या कामाला सुरूवात झाली नव्हती. खाण खात्याकडून ही वसुली सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. इम्रान खान याच्याकडून लुटीची वसुली करण्यात यावी यासाठी एसआयटीने खाण खात्याला एका महिन्यापूर्वी पत्र लिहिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
खाम खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात कारवाईसाठी आताच फायली सरकू लागल्या आहेत. इम्रान खानच्या घोटाळ्या संबंधात खाण खात्याकडे काहीच माहिती नसल्यामुळे आवश्यक कागदपत्रे खाण खात्याला देण्यात यावीत अशा आशयाचे पत्र खाण खात्याकडून एसआयटीला पाठविले आहे. एसआयटीकडून या बाबतीत लवकरच खाण खात्याला माहिती पुरविली जाणार आहे.
इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाणीची चौकशी केली असता मोठा घोटाळा आढळून आला होता. फ्रिग्रेडो यांच्याकडून बेकायदेशीररित्या पावर आॅफ एटॉर्नी घेऊन इम्रान खान याने बेसुमारपणे खनिजाचे उत्खनन केलेले आढळून आले होते.
कोणत्याही अधिकृत दाखल्याविना, परवानगी विना हे उत्खनन करण्यात आले आहे आणि त्यात सर्वज कायद्यांचे उल्लंघन करण्यात आलेले आढळून आले. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याची १०० कोटी रुपयाहून अधिक कायम ठेवी आढळून आल्या होत्या. त्यापैकी ७० कोटी रुपयांच्या ठेवी गोठविण्यात आल्या आहेत. एसआयटी या प्रकरणात चौकशी करीत असली तरी वसुलीचे अधिकार एसआयटीला नाहीत. हे काम सरकारचे असल्यामुळे एसआयटीने खाण खात्याला या संबंधी पत्र लिहिले होते. परंतु जवळ जवळ महिनाभर ही फाईल तशीच पडून होती. सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील सर्व खाणींची नूतनीकरणे रद्द करतानाच लुटीच्या वसुलीचे दिलेल्या वसुलीचा धसका खाण खात्याने घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.