वासुदेव पागी/ पणजी - खाण घोटाळयात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबईतीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (इडी) पत्र लिहिले आहे. इम्रान खान हा मनी लॉंडरिंगमध्ये अडकला असल्यामुळे त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे त्यात म्हटले आहे.
खाण ट्रेडर इम्रानच्या विरोधात चौफेर चौकशीचे जाळे फेकण्याच्या प्रयत्नात एसआयटी असून विविध एजन्सींना इम्रानच्या कारनाम्याचे माहिती देऊन कारवाईची सूचना एसआयटीकडून केली जात अहे. खाण खात्याबरोबरच अंमलबजावणी खात्यालाही एसआयटीने पत्र लिहून इम्रानचे व्यवहार कळविले आहेत. त्याचे दुबईत असलेल्या बँक खात्याची माहितीही देण्यात आली आहे. हा मनी लॉन्डरिंगचा प्रकार असून त्याची चौकशी केली जावी असे त्यात म्हटले आहे.
मनी लॉन्डरिंग हा एसआयटीच्या अखत्यारीच्या बाहेरील विषय असून अंमलबजावणी विभागच या बाबतीत कारवाई करीत असतो. त्यामुळे तपासाचा हा भाग अंमलबजावणी विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांकडून देण्यात आली. एसआयटीकडून तशा आशयाचे पत्र मिळाल्याची माहिती अंमलबजावणी खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली.
एसआयटीकडून मंगळवारी खाण खात्यालाही पत्र दिले होते. त्यात इम्रान खानवर खाण खात्याकडून जी कारवाई करायला हवी आहे त्या बद्दल लिहिले आहे. एमएमआरडी कायद्यानुसार एखाद्याला देण्यात आलेले खाण लीज हे लीजधारकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियांच्या नावावर होण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती न करता त्या खाणीचा पावर आॅफ एटोर्नी कुणीही देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. परंतु इम्रान खानने ते केले आहे. इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाण लिजाची बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटॉर्नी घेऊन उत्खनन केल्यामुळे हे मंजूर झालेले खाण लीज काढून घेण्याची शिफारस केली आहे.
लीजच्या करारात तशी तरतूत असल्याचेही म्हटले आहे. वनखात्याचा व इतर आवश्यक परवाने न घेता आतापर्यंत बेकायदेशीरपणे उत्खनन करून इम्रानने कोट्यवदी रुपयांचा व्यवहार केला आहे. वसुलीचे अधिकारी हे एसआयटीला नाहीत, परंतु खाण खात्याला आहेत त्यामुळे हे पैसे वसूल करून घेण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान अद्याप त्याबद्दल खात्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.