मुरगाव नगरपालिकेने चार बेकायदेशीर बांधकामावर चढवला ‘बुलडोझर’
By पंकज शेट्ये | Published: November 30, 2023 06:13 PM2023-11-30T18:13:23+5:302023-11-30T18:15:01+5:30
बेकायदेशीर बांधकामे पालिकेने जमिनदोस्त केल्याची माहीती स्थानिक नगरसेवक अमेय चोपडेकर यांनी दिली.
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: साईनगर येथील फकीरगल्ली भागात उभारलेल्या चार बेकायदेशीर बांधकामावर गुरूवारी (दि.३०) मुरगाव नगरपालिकेने कारवाई करून ती जमिनदोस्त केली. फकीरगल्ली भागात लोकहीतासाठी रस्ता बांधण्याचा प्रस्ताव असून त्याच ठीकाणी बांधलेली ती बेकायदेशीर बांधकामे पालिकेने जमिनदोस्त केल्याची माहीती स्थानिक नगरसेवक अमेय चोपडेकर यांनी दिली.
गुरूवारी सकाळी ११ वाजता मुरगाव नगरपालिकेने त्या चार बेकायदेशीर बांधकामावर कारवाईला सुरवात केली. १ जेसीबी मशिन आणि ७ कामगारांना घेऊन कारवाईला सुरवात केल्यानंतर संध्याकाळीपूर्वीच मुरगाव पालिकेने चारही बांधकामे जमिनदोस्त केली. त्या चार बेकायदेशीर बांधकामापेकी दोन बांधकामात लोक रहायचे तर अन्य दोन बांधकामात विविध सामान आणि बकरी, कोंबडी आदी जनावरांचे पालन केले होते. कारवाईबाबत अधिक माहीतीसाठी मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक अमेय चोपडेकर यांना संपर्क केला असता त्या भागातील लोकांना रस्त्याचा अभाव असल्याने त्यांना वाहने घेऊन अनेकवेळा चुकीच्या दिशेने जावे लागत असल्याचे सांगितले.
त्यामुळे तेथील लोकांच्या सुरक्षेसाठी आणि हीतासाठी तेथे नवीन रस्ता बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याच परिसरात अतक्रिमण करून ती बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली होती. मुरगाव नगरपालिकेने त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी उचित पावले उचलून गुरूवारी ती जमिनदोस्त केल्याचे चोपडेकर यांनी सांगितले.