गोवा विद्यापीठ निवडणुका पर्रीकर सरकारसाठी बनल्या प्रतिष्ठेच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 11:31 AM2017-10-11T11:31:44+5:302017-10-11T11:32:10+5:30
दिल्लीमध्ये जेएनयू विद्यापीठाच्या निवडणुकीत भाजप समर्थकांचा पराभव झाला तरी, गोव्यात मात्र विद्यापीठ निवडणुका कोणत्याही प्रकारे जिंकायलाच हव्यात.
पणजी - दिल्लीमध्ये जेएनयू विद्यापीठाच्या निवडणुकीत भाजप समर्थकांचा पराभव झाला तरी, गोव्यात मात्र विद्यापीठ निवडणुका कोणत्याही प्रकारे जिंकायलाच हव्यात असे भाजपच्या विद्यार्थी शाखेने ठरवले आहे. गोव्यातील भाजपच्या काही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही गोवा विद्यापीठ निवडणूक यावेळी बरीच प्रतिष्ठेची बनवली आहे. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळासाठी निवडणूक येत्या 16 रोजी होत आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसची एनएसयूआय शाखा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप समर्थक विद्यार्थी एकत्र आले. त्यानी निवडणूक खुल्या पद्धतीने घेतली जावी अशी मागणी केली.
सर्व विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा असे एनएसयूआयचे म्हणणे आहे. ही मागणी घेऊन कुलगुरू वरुण साहनी यांना भेटण्याचा एनएसयूआयने प्रयत्न केला पण कुलगुरू भेटीसाठी वेळ देत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एनएसयूआयने घेतला आहे. भाजपच्या वविद्यार्थी शाखेकडून काही विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जातात तर काहींना लाच दिली जाते असा आरोप एनएसयूआयचे अध्यक्ष अहरज मुल्ला यांनी केला आहे.
दुसऱ्याबाजूने भाजप समर्थक विद्यार्थ्यांचे पॅनल उत्साहात आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकताच महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधला. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहेत हे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जाणून घेतले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये मोफत वायफाय देण्याची मागणी विचारात घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील अंमली पदार्थ व्यवसायाविरूद्ध पोलिस यंत्रणेकडून कशी आघाडी उघडण्यात आली आहे याविषयीची माहितीही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना दिली.