पणजी: ट्रेडर आणि खाण मालकांनंतर खनिज घोटाळा प्रकरणात तपास करणा-या विशेष तपास पथकाने खाण खात्याच्या काही अधिका-यांची हजेरी घेणार आहे. बेकायदेशीर खनिज उद्योगाला खतपाणी घालण्याचे गंभीर गुन्हे करूनही केवळ शुल्लक दंडावर या प्रकरणावर चादर घालण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे खीळ बसणार आहे. या प्रकरणात धरपकडही होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीने आता खाण खात्याच्या कर्मचारी आणि काही अधिका-यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. या काही अधिका-यांनी कायदा धाब्यावर बसवून खाण मालकांना विविध दाखले दिले होते. तसेच चोरीचा खनिज माल निर्यात करण्यासाठीही परवानगी दिली होती. बेकायदेशीर उत्खनन प्रकरणात तक्रारी आल्यानंतर पहाणीसाठी गेलेल्या अधिका-यांनी नेमकी कशी पाहणी केली.
कायदे नियम बाजूला सारून कसा अहवाल दिला, जप्त करण्यात आलेली मशिनरी उत्खनन करणा-यांना कशी परत दिली याची सारी माहिती एसआयटीला आहे. एसआयटीने या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केला असून त्यांच्याकडे पुरावेही आहेत. हे अधिकारी आणि कर्मचारी कोण आहेत हे ही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे केव्हाही त्यांना समन्स बजावले जाऊ शकतात. समन्स न बजावताही अटक केली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष सूत्रांकडून ही म माहिती देण्यात आली.
डॉ एम बी शाह यांच्या खाण प्रकरणातील अहवालात खाण खात्याच्या अनेक अधिका-यांवर ठपके ठेवले होते. त्यापैकी काहींना निलंबितही करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. पैकी काही अधिका-यांनी ही शक्यता लक्षात घेऊन या अगोदरच अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जांवर सुनावणी सुरू आहे.
एसआयटीकडून आतापर्यंत या प्रकरणात काही ट्रेडरना अटक केली आहे आणि त्यांची जामीनवर सुटकाही झाली आहे. त्यापैकी अटक करण्यात आलेला इम्रान खान याच्याकडे १०० कोटी रुपयाहून अधिक रक्कम एसआयटीला सापडली होती आणि त्या पैकी ६० कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. अनिल खंवटे आणि राजेश तिंबले यांना एसआयटीकडून समन्स पाठविण्यात आले होते. त्यापैकी खंवटे यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांच्या जामीनवर न्यायालयात सुनावण्या चालू आहेत.