पणजी : पर्यटन खात्याने यापूर्वीच्या काळात विदेशात अनेक रोड शो व प्रदर्शने केली आहेत. मी विदेशातील सोहळ्यांचे हे प्रमाण कमी केले व रोड शोवरील खर्चातही कपात केली. माझे कुटुंबीय माझ्यासोबत अमेरिकेच्या दौ-यावर गेले म्हणून काही जणांनी आक्षेप घेतला. तो आक्षेप निराधार आहे. दौरा यशस्वी ठरला आहे. मी दलित समाजातून आलेलो असल्याने माझ्या दौ-याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह अन्य काही जणांनी आक्षेप घेतला, असा दावा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अमेरिकेहून गोव्यात परतल्यानंतर केला आहे.अमेरिकेत पर्यटन खात्याने रोड शो आयोजित केला होता. मंत्री आजगावकर यांच्यासोबत त्यांचे बंधूू वगैरे अमेरिकेला गेले होते. पर्यटन खात्याचे उपसंचालक व राज्याचे मुख्य सचिवही शासकीय शिष्टमंडळाचा भाग बनून अमेरिकेला गेले होते. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हे पर्यटन महामंडळाचे चेअरमन या नात्याने सहकुटुंब अमेरिकेच्या दौ-यावर होते. तथापि, मंत्री आजगावकर यांचे सहकुटुंब अमेरिकेला जाणे गाजले. याविषयी आजगावकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की माझ्या कुटुंबाचे सदस्य माझ्यासोबत अमेरिकेला गेले होते यात काहीच वाईट नाही. मला कुणी तरी कुटुंबातीलच सदस्यांनी कंपनी द्यावी असे वाटल्यामुळे मी त्यांना सोबत नेले होते. ते स्वत:च्या क्षमतेने अमेरिकेला आले. माझ्या कुटुंबातील सदस्य हे मोठ्या हुद्यावर आहेत. माझा भाऊ व्यवसायाने डॉक्टर आहे आणि माझ्यासोबत आलेली कुटुंबाची अन्य सदस्य ही अबकारी खात्यात अधीक्षक आहे. त्यांच्याकडे स्वखर्चाने अमेरिकेला जाण्याची क्षमता आहे. उगाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर कुणी बाऊ करू नये.मंत्री आजगावकर म्हणाले, की यापूर्वी अनेक पर्यटन मंत्री विदेशात रोड शोनिमित्ताने जाऊन आले आहेत. मी शासकीय शिष्टमंडळाचा भाग बनून गेलो होतो. मी दलित समाजातून वर आलो आहे. मी दलित असल्यानेच माझ्या अमेरिका दौ-यावर काही जणांनी टीका केली पण मी अशा टीकेची पर्वा करत नाही. गोव्याचे पर्यटन वाढावे म्हणून आम्ही अमेरिकेत रोड शो आयोजित केला. यापूर्वी रोड शो व प्रदर्शनांवर जसा खर्च होत होता तसा आता होत नाही. मी खूप कपात केली आहे. आम्ही दलित समाजातील लोकांनी यापूर्वी खूप अन्याय व अत्याचार भोगलेला आहे. आमचे नेहमी शोषणच झाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व मला पर्यटन मंत्री केले. आम्ही आता विदेश दौरा वगैरे करतो हे पाहून काही जणांच्या पोटात दुखते. मात्र त्याला ईलाज नाही. काँग्रेसमधील काही जण हे खंडणीबहाद्दर आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केल्याचे मला कळाले आहे.
अमेरिकेला सहकुटुंब गेलेले गोव्याचे मंत्री, आमदार परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 10:09 PM