संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले आक्रमणकर्ते, गोव्याच्या पर्यटन खात्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:32 AM2021-04-03T08:32:09+5:302021-04-03T08:33:30+5:30
Goa's tourism department News : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवा पर्यटन खात्याने ट्विटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पणजी : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवापर्यटन खात्याने ट्विटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे वादग्रस्त ट्विट खात्याने त्वरित मागे घेऊन सारवासारव केली.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करताना भाजपच्या मॉडीफाइड इतिहासाच्या धोरणामुळे पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अपमान झाला असल्याचे म्हटले आहे. सरकारने जनतेची व स्वाभिमानी देशभक्तांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या अपमानाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कडक समज देणार : पर्यटनमंत्री
दरम्यान, संतापाची लाट पसरल्यानंतर पर्यटन खात्याने त्वरित ट्विट मागे घेऊन शुद्धिपत्रक टाकले आहे. चुकीची दुरुस्ती केलेली आहे तसेच ज्याने कोणी हा प्रकार केला त्याने माफी मागून खंतही व्यक्त केली आहे. परंतु असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी मी कडक शब्दांत अधिकाऱ्यांना समज देणार आहे, असे पर्यटनमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले.