धावत्या रेल्वेत सोने चोरी: एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला: ३० लाखांचं सोनं जप्त
By सूरज.नाईकपवार | Published: July 9, 2023 04:50 PM2023-07-09T16:50:26+5:302023-07-09T16:54:16+5:30
पोलिसांनी संशयितांकडून १ कोटीचे सोने व ५० हजार रोख रक्कम जप्त केली होती.
मडगाव - धावत्या रेल्वेत सोने चोरी प्रकरणात गोव्याच्या कोकण रेल्वे पोलिसांच्या जाळयात आणखी एक जण सापडला. पोलिसांनी बेळगाव येथून एकाला उचलले. संतोष शिरतोडे असे संशयिताचे नाव आहे. त्याला बेळगाव येथील शहापूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडून ३० लाखांचे सोने व चार लाख पाच हजार रुपये जप्त केले. त्याने या चोरी प्रकरणात संशयिताने चोरलेले सोने वितळले होते. अधिक तपासासाठी त्याला सात दिवसांची पाेलिस कोठडी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणात यापुर्वी पोलिसांनी संदीप भोसले, अक्षय चिनवाल , धनपत बैड व अर्चना उर्फ अर्ची मोरे या चारजणांना यापुर्वीच अटक केली होती. सदया हे संशयित पोलिस कोठडीत आहेत.
पोलिसांनी वरील संशयितांकडून १ कोटीचे सोने व ५० हजार रोख रक्कम जप्त केली होती. नंतर मुंबई येथील झवेरी बाजार येथे जाउन आणखिन १२ लाखांचे सोने जप्त केले होते. संशयिताचे मोबाईल व दोन कारही पोलिसांनी जप्त केले होते. २ मे रोजी काणकोण येथे रेल्वे क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबली असता, चोरीची वरील घटना घडली होती. अशोक पाटील हे रेल्वेतून केरळ येथे सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी प्रवास करीत असताना, त्याची बॅग चोरुन नेली होती. त्यात चार कोटीचे सोने होते. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत संशयित गजाआड झाले होते.
पोलिस तपासात यातील काही सोने बेळगावला वितळण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानंतर कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेड्डी, सत्यावान गावकर यांनी बेळगावला जाउन संतोषच्या मुसक्या आवळल्या.