म्हापसा : तो चोरलेली दुचाकी रस्त्याकडेला पार्क करून बाकावर झोपला आणि पोलिसांच्या तावडीत आयता सापडला, असा प्रकार साळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून केलेल्या तपासणीनंतर चोरट्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मिंटू मोल्ला ( २८, कळंगूट, मूळ पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिस निरीक्षक मिलिंद भईंबर यांनी सांगितले की, साळगाव पोलिस गस्तीवर असताना साळगाव-पर्रा रस्त्यावर एका ठिकाणी एक तरुण दुचाकी पार्क करून रस्त्याकडेला झोपला होता. त्याच्यावर संशय आल्याने गस्तीवरील पोलिसांनी त्याची दुचाकी तपासली. यावेळी दुचाकीच्या पुढच्या बाजूला वेगळी आणि मागील बाजूला वेगळ्या क्रमांकाची नंबरप्लेट लावण्यात आल्याचे पोलिसांच्या नजरेला आले. त्यांनी लगेच झोपलेल्या त्या व्यक्तीची चौकशी केली. मात्र चोरटा त्या दुचाकीवर स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्याला ताब्यात घेण्यात आले. मिंटू मुल्ला असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिस स्थानकात आणले असता त्याने दुचाकी पणजीतून ५ मे रोजी चोरल्याची कबुली दिली.
दुचाकीच्या मूळ मालकाने आपल्या दुचाकी चोरीची तक्रार पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. या प्रकरणात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर, हवालदार तारक कुंडईकर, कॉन्स्टेबल रामा नाईक यांचे कौतुक केले जात आहे. पुढील तपास हवालदार तारक कुंडईकर करीत आहेत.