पणजी : राज्यातील सर्व रस्त्यांवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी वाहतूक खात्याने सुरू केली आहे. येत्या दि. २ आॅक्टोबरपासून दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेला प्रवासी या दोघांसाठीही हेल्मेट सक्तीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात रविवारी विविध ठिकाणी चार वाहन अपघात झाले. त्यात तिघा दुचाकीस्वारांचा बळी गेला. त्यानंतर सोमवारपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली. राज्यभर अनेक ठिकाणी सोमवारी दुचाकी अडवून हेल्मेटबाबत विचारणा केली. एरव्ही राष्ट्रीय महामार्गांवरच दुचाकी अडवून हेल्मेट विचारले जाई; पण सोमवारी पणजीतील कला अकादमीसमोरील मार्गावरही आरटीओकडून दुचाकी अडविण्यात आल्या. दुचाकी चालविणारी व्यक्ती आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट कोठे आहे, असे विचारण्यात आले. सर्वत्र दुचाकीस्वारांना व दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेटची सक्ती आॅक्टोबरमध्ये केली जाईल, अशी घोषणा विधानसभा अधिवेशनातही झाली होती. त्याची रंगीत तालीम सोमवारपासून सुरू झाली. (खास प्रतिनिधी)
राज्यात सर्व रस्त्यांवर हेल्मेट सक्ती
By admin | Published: September 09, 2014 2:08 AM