लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे: जमीन झोनिंग प्लॅन २४ तासांच्या आत रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी शुक्रवारी (दि.६) सकाळी भेट घेतली जाणार आहे. तेव्हा जर त्यांनी ऐकले नाही तर त्यानंतर रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार, असा एकमुखी ठराव सर्वानुमते गुरुवारी मांद्रे येथे आयोजित तालुक्यातील जनजागृती सभेत घेण्यात आला.
पेडणे तालुक्यातील जमीन झोन बदल आराखडा त्वरित रद्द झाला नाही, तर आपण जनतेसोबत रस्त्यावर उतरायला तयार असेन. मुख्यमंत्री सावंत यांनी भेटायला बोलावले आहे. जनतेला हवा तसा प्लॅन करून देणार असल्याची जर ग्वाही दिली तर ठीक अन्यथा रविवारी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार परशुराम कोटकर, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मांद्रे सरपंच अमित सावंत, केरी सरपंच धरती नागोजी, मोरजी सरपंच उमेश गडेकर, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, सरपंच नवनाथ नाईक, पार्से सरपंच अजय कलंगुटकर, आगरवाडा सरपंच अंथनी फर्नांडिस तुये सरपंच सुलक्षा नाईक, माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू भास्कर नारुलकर यांच्यासह विविध पंचायतीचे पंच उपस्थित होते.
आमदार आरोलकर यांनी सांगितले की, सरकारने जनतेला हवा तसा आराखडा तयार करावा.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
आमदार आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वा. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन तालुक्यातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते सोबत ही बैठक होणार आहे. जनतेला हवा तसा प्लॅन करा, सध्याचा रद्द करावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.