गोव्याचा मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही - विनय तेंडुलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:42 PM2018-09-22T16:42:05+5:302018-09-22T17:17:03+5:30
मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात ठेवलेली नाही व मी त्यादृष्टीने प्रयत्नही केला नाही. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पणजी : मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात ठेवलेली नाही व मी त्यादृष्टीने प्रयत्नही केला नाही. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने आणि त्यांचा बहुतांशवेळ इस्पितळातच जात असल्याने मुख्यमंत्री तात्पुरता तरी बदलावा व खासदार तेंडुलकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवावी असा विचार भाजपामध्ये चर्चेत असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने घेतलेल्या मुलाखतीवेळी तेंडुलकर यांनी सांगितले, की माझ्या नावाची चर्चा भाजपमाध्ये मुळीच सुरू नाही. मी बाहेरून अफवा ऐकत नाही. मी राज्यसभा खासदार म्हणून समाधानी आहे. शिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आहे. मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही. गोव्यात सरकारमध्ये नेतृत्व बदलाचाही विषय नाही. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येत नाही.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी तुमच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार झाला होता काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की शहा यांच्यासोबतच्या बैठकीत माझ्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर हेही सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर पक्षाचे तीन केंद्रीय निरीक्षकही बैठकीस आले होते. आम्ही गोव्यातील सगळी राजकीय माहिती शहा यांच्यासमोर ठेवली. शहा यांना गोव्यातील सगळी वस्तूस्थिती कळून आली आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, पण मी मुख्यमंत्री व्हावे असा विषय मुळीच नाही. बैठकीत तशी कोणतीच चर्चा झालेली नाही. त्या निव्वळ अफवा आहेत.
तुम्ही दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटला का असे विचारले असता, तेंडुलकर म्हणाले की मी भेटलो नाही. भाजपाचे गोवा प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे मनोहर पर्रीकर यांना इस्पितळात भेटले. मनोहर पर्रीकर हेच सत्ताधारी आघाडीचे नेते आहेत व त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद राहील.