- सदगुरू पाटील
पणजी - गेले दहा दिवस भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने(इफ्फी) गोवा सरकार आणि सरकारचे सारे प्रशासन इफ्फीच्याच मूडमध्ये होते. मंगळवारी इफ्फीचा समारोप झाला आणि सरकारही या मूडमधून बाहेर आले. बुधवारपासून प्रशासकीय कामे नव्याने सुरू झाली आहेत.
इफ्फीच्या समारोप सोहळ्य़ाला पर्रीकर सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहिले. सत्ताधारी भाजपचे हजारो कार्यकर्ते समारोप सोहळ्य़ात सहभागी झाले. गेल्या 20 नोव्हेंबर रोजी इफ्फीचे उद्घाटन झाले होते. तथापि, तत्पूर्वी एक दिवस अगोदरच सरकार व प्रशासन इफ्फीच्या मूडमध्ये गेले होते. मंत्रालयात व सचिवालयात त्यामुळे कामे पूर्वीसारखी होत नव्हती. विविध खात्यांचे प्रमुख, अधिकारी वगैरे इफ्फीशीनिगडीत कामांमध्ये व्यस्त होते. इफ्फीसाठी प्रशासनालाही वावरावे लागते. अग्नी शामक दल, बांधकाम खाते, वीज खाते, पोलीस, वाहतूक अशा खात्यांचा जास्त संबंध या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सोहळ्य़ाशी येतो. कधी विधानसभा निवडणुका, कधी विधानसभा अधिवेशन तर कधी अन्य एखाद्या मोठ्या सोहळ्य़ाच्या आयोजनानिमित्ताने प्रशासकीय कामांच्या वेगावर परिणाम झालेला पहायला मिळतो. यावेळी इफ्फीमुळे गेले दहा दिवस पूर्ण प्रशासन संथ बनले होते. एरव्ही दर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठका होत असे पण गेले दोन बुधवार मंत्रिमंडळाच्या बैठकाही झाल्या नाहीत. काही मंत्र्यांना इफ्फीमध्ये रस नव्हता. ते परराज्यांत आपल्या कामानिमित्त गेले होते. नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई सध्या दुबईमध्ये आहेत तर आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे बंगळुरूमध्ये आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना इफ्फीच्या उद्घाटन आणि समारोप या दोन्ही सोहळ्य़ांना उपस्थित रहावे लागले. शिवाय त्यांनी अधूनमधून गोवा मनोरंजन संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू ठेवून इफ्फीनिमित्ताने सारी व्यवस्था पाहिली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केले असून जगभरातील पाहुण्यांची इफ्फीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी व गोवा सरकारने चांगली व्यवस्था केल्याबाबत आपण आभार मानते, असे इराणी यांनी म्हटले आहे.
इफ्फीत दाखविल्या गेलेल्या शेकडो सिनेमांचा लाभ अनेक सरकारी अधिकारी व कर्मचा:यांनीही घेतला. त्यामुळे सचिवालयात पत्रकारांनी देखील कधीही भेट दिली तर अधिका:यांमध्ये इफ्फीसंदर्भातच चर्चा ऐकायला मिळायची. दरम्यान, गोवा सरकारला आता सेंट ङोवियर फेस्त हा आणखी एक मोठा सोहळा हाताळावा लागणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू आहे. येत्या दि. 4 डिसेंबरला हे जगप्रसिद्ध फेस्त होत आहे. अर्थात या फेस्ताचा भार हा प्रशासनावर इफ्फीएवढा मोठा नसेल.