आयआयटी प्रकल्प रिवणमध्येच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 10:39 AM2024-03-14T10:39:49+5:302024-03-14T10:40:30+5:30
सांगे पालिकेत 'संकल्प पत्र अभियान'
लोकमत न्यूज नेटवर्क केपे : आयआयटी प्रकल्प रिवण सांगे येथेच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. विकसित भारत मोदी की हमी संकल्प पत्र अभियान सांगे पालिकेच्या सभागृहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळ देसाई, माजी मंत्री बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष अर्चना गावकर, रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर तसेच पक्षाचे अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्थानिक खेळाडूंचा या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळात खेळाडूंसाठी 'खेलो इंडिया'चा नारा दिला, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले.
सरकारने युवांसाठी विविध योजना आणल्या आहेत. तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. खासदार सार्दिन यांना सांगे मतदारसंघात कुणीही ओळखत नाही. कारण ते लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. जो विकास झाला आहे, तो फळ देसाई यांच्या कार्यकाळातच झाला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्री फळ देसाई म्हणाले, मतदारसंघाचा विकास आणि विस्तार हा भाजपा आणि मोदी सरकारमुळे होत आहे. राज्याला केंद्राकडून ३० हजार कोटींचा निधी मिळाला.