बेकायदेशीर मृत्युदाखला प्रकरणी गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 08:07 PM2018-02-06T20:07:36+5:302018-02-06T20:08:02+5:30
गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पणजी - गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदेशीरपणे मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात डॉ बाणावलीकर यांची आरोग्य खात्याकडून चौकशी सुरू केली होती. त्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने तपासाचा अहवाल काही महिन्यांपूर्वी सरकारला सादर केला होता. तसेच डॉ बाणावलीकर हे अवैधरित्या मृत्युचे दाखले देतााच पोलीस प्रकरणातही अडकले गेले. फोंडा येथे एका संशयास्पद मृत्यु प्रकरणात त्याने दिलेला मृत्युचा दाखला हा त्यांच्या अंगलट आला होता. त्यामुळे क्राईम ब्रँॅचकडूनही त्याची चौकशी झाली होती. क्राईम ब्रँचच्या अहवालातही तो दोषी आढळला होता. या दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून त्याला सेवेतून निलंबित करण्याची शिफारस सरकारने दक्षता खात्याला केली होती. मंगळवारी या प्रकरणात दक्षता खात्याकडून बाणावलीकर यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. निलंबन काळात बाणावलीकर यांना सचिवालयात सार्वजनिक आरोग्य खात्यात हजेरी लावावी लागणार आहे.
फोरन्सिक विभागातील डॉक्टर इतर ठिकाणी जाऊन मृत्युचे दाखले देऊ शकत नाही. गोमेकॉच्या नियमांचा तो भंग ठरत आहे. परंतु हे नियम गुंडळून ठेऊन बाणावलीकर मृत्युचे दाखले देत होते. दाखल्याच्या नावाने पैसे घेत नव्हते परंतु प्रवास खर्चाच्या नावाखाली पैसे घेत होते असे त्यांच्यावर आरोप होते. या प्रकरणाची अरोग्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला होता.