किशोर कुबल
पणजी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदा इयत्ता नऊवीपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. पूर्व प्राथमिक स्तरावर नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. नऊवीच्या बाबतीत आज शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाईल.
शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर म्हणाले की, ‘सरकारी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. एनसीईआरटी, निपा, इंडियन स्कुल ॲाफ बिझनेस, इंडियन इन्स्टिट्युट ॲाफ सायन्स यांच्याकडे हातमिळवणी केली असून शिक्षकांचा दर्जा सुधारेल. पालकांनी सरकारी विद्यालयांना प्राधान्य द्यायला हवे अशा पध्दतीने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
तिसरीची तीन पुस्तके बदलली
दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरीची तीन पाठ्यपुस्तके बदलली आहेत तर सहावीसाठी जुनीच पाठ्यपुस्तके लागू असतील, असे एससीईआरटी संचालक मेघना शेटगांवकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.