सूरज नाईकपवार,मडगाव : गोव्यातील मडगाव येथील भू-सर्वेक्षण खात्यातील मुख्य सर्वेक्षकाला मारहाण प्रकरणातील संशयित रॉडनी सावियो ऑल्वन गोम्स हा विदेशात पळून गेल्याची दाट शक्यता असून, त्यासंबधी माहिती गोळा करण्यासाठी सदया पोलिसांनी विमान प्राधिकरणाकडे संपर्क साधला आहे. संशयिताबद्दल कुठलीही माहिती असल्यास ती द्यावी असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्याशी संपर्क साधला असता, अजूनही संशयिताचा ठावठिकाणा सापडलेला नसून, आम्ही तपास करीत असल्याचे ते म्हणाले. सर्व बाबी पोलिस पडताळून बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवार, दि. १८ रोजी दुपारी येथील माथानी साल्ढाणा संकुलात असलेल्या भू सर्वेक्षण खात्यातील मुख्य सर्वेक्षक प्रसाद सावंत देसाई यांना कार्यालयात आलेल्या एका अनोळखी इसमाने मारहाण केली होती. हेल्मेटने मारहाण करून नंतर संंशयिताने घटनास्थळाहून पळ काढला होता. या मारहाणीत देसाई हे जखमी झाले होते.
पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र, त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती, अशी माहिती मिळाली होती. चौकशीत पोलिसांना संशयिताचे नाव सापडले होते. पोलिस त्याच्या शोधात असून तो विदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
संशयितावर पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली आहे. भादंसंच्या ३२३, ५०४, ३५३ व ५०६ (२) कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.