लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. सरकारची कृती अयोग्य आहे, असे म्हणत गांधी यांच्यावरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेरशी येथे सत्यागृह आंदोलन केले.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जर सरकार अन्याय करीत असेल, तर आज देशातील सामान्य जनतेचे काय? सरकार हुकूमशाहीप्रमाणे वागत असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोपही त्यावेळी केला.
मेरशी येथील चर्च परिसरात या सत्यागृह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, नेते एल्वीस गोम्स, जॉन नाझारेथ तसेच पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे व कुंभारजुवे येथील काँग्रेस गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांना अपात्र ठरविल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असा ४ हजार किलोमीटरचा पल्ला गाठला. या यात्रे दरम्यान त्यांनी केंद्र सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. मोठ्या उद्योगपतींना हे सरकार कसे मदत करते हे सुद्धा त्यांनी जनतेला दाखवून दिले. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला ते आवडले असल्यानेच त्यांच्याविरोधात गुजरात येथे गुन्हा दाखल केला. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली. यावरून सरकारने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी हे केवळ सामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारला ते आवडत नसल्यानेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कटकारस्थान रचून त्यांना खासदार पदासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा कायम राहील, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"