नारायण गावस
पणजी: आता मार्च महिना सुरु झाला तरी आंब्याच्या किमती मात्र अजून सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत. पणजी मुख्य मार्केटमध्ये हापूस आंबा १२०० ते २ हजार प्रती डझनने विकला जात आहे. तर मानकुराद आंब्याची आवक कमी असल्याने ४ हजार ते ५ हजार प्रती डझनने विकला जात आहे.
पणजी, म्हापसा या मुख्य मार्केटमध्ये सध्या आंबे दाखल झाले असून ते भाव खात आहेत. राज्यात रत्नागिरीहून हापूस आंबा आयात केला आहे पण त्यांच्या किमती या सर्वसामान्य लाेकांच्या बाहेर आहेत. लहान आकाराचे आंबा १२०० रुपये डझनने विकला जात आहे तर माेठ्या आकाराचा २ हजार रुपये आहेत. गोव्यातील प्रसिद्ध असा मानकुराद आंबा अजून माेठ्या प्रमाणात आलेला नाही. काही आंबे दाखल झाले आहेत पण त्यांच्या किमती या हापूस पेक्षा तिप्पट आहे. मानकुराद गेल्या महिन्यात बाजारात दाखल झाला होता. त्यावेळी ६ हजार प्रती डझन विकला जात होता. आता ४ ते ५ हजार रुपये डझनने विकला जात आहे. सर्वसामान्य साेडाच मध्यमवर्गीय लाेक सुद्धा एवढा महाग आंबा खरेदी करताना अनेक वेळा विचार करणार आहे.
राज्यात मानकुरादला जास्त मागणी असते पण यंदा मानकुराद पीक खूप कमी आहे. तसेच अजून आवकही वाढलेली नसल्याने दरात प्रचंड वाढ आहे. एप्रिल ते मे महिन्यात मानकुरातची आवक वाढल्यावर त्यांच्या किमती कमी होत असतात. आवक वाढल्यावर मानकुरादच्या किमती ६०० रुपये पर्यंत खाली येते. तर हापूस ३०० रुपये पर्यंत खाली येतो. राज्यात मानकुराद तसेच हापूस आंब्याच्या पीक घेतले जाते तरीही कोकणातून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात आयात केला जात आहे.
सुरवातीचे पीक असल्याने आंब्याला मागणी मोठी असते. पण आवक कमी असल्याने दरात प्रचंड वाढ होत असते. आणखी २० दिवस तरी आंब्याच्या किमती कमी हाेणार नाही. एप्रिल महिन्यापासून काही प्रमाणात दर कमी होऊ शकतात. असे पणजी मार्केटमधील फळ विक्रेते युसुफ शेख यांनी सांगितले.