गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी- ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा’, अॅपधारित टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणीपणजी : गोव्यात टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा’ तसेच अन्य अॅपधारित टॅक्सी सेवेविरुध्द धरणे आंदोलन सुरु केले आहे. सरकारला दोन दिवसांची मुदत देत अॅप मोडित न काढल्यास ८ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेंट ए कार, रेंट ए बाइक, रिक्षा, मोटरसायकल पायलट तसेच खाजगी बसमालकांना आंदोलनात सहभागी होतील आणि संपूर्ण गोवा ठप्प करु, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
अॅपधारित टॅक्सीसेवा बंद करण्याच्या मागणीपुष्ठ्यर्थ टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी कालपासून येथील आझाद मैदानावर धरणे धरले आहे. आंदोलकांचे नेतृत्त्व करणारे टॅक्सी व्यावसायिक बाप्पा कोरगांवकर यांनी आम्हाला टॅक्सी सेवेसाठी कोणत्याच प्रकारचे अॅप नको. गोमंतकीयाने काढलेले अॅपही नको, असे सांगितले. गोवा माइल्स तसेच अन्य अॅप सेवेत परप्रांतीय आलेले आहेत. एवढी वर्षे भूमिपुत्रांच्या हातात असलेला टॅक्सी व्यवसाय आता त्यांच्या हातातून निसटण्याची भीती निर्माण झालेली आहे, असे ते म्हणाले. अॅप मोडित काढण्याची मागणी दोन दिवसात सरकारने मान्य न केल्यास वाहतूक क्षेत्रातील अन्य व्यावसायिकांनी एकत्र आणून आंदोलन तीव्र केले जाईल आणि राज्यभर पसरविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, अन्य एका आंदोलक टॅक्सी व्यावसायिकाने सांगितले की, ‘ अॅप मोडित काढण्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील. पोलिसांनी अटक केल्यास कोणीही जामिनासाठी अर्ज करणार नाही. आम्ही ‘जेल भरो’ आंदोलन करु. प्रसंगी कुंटुबियांनाही आंदोलनात सहभागी करु, असे तो म्हणाला. सत्ताधारी भाजपचे चार ते पाच आमदार अॅपधारित टॅक्सीसेवेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याने केला.