आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 10:22 AM2024-04-16T10:22:40+5:302024-04-16T10:25:45+5:30

प्रचाराची रणनीतीही ठरली

india alliance parties meeting for goa lok sabha election 2024 includes congress goa forward aap ncp sharad pawar group shiv sena thackeray group | आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव :इंडिया आघाडीला तीन अटी घालून जागा वाटपासंबंधी चर्चेला तयार असल्याचे पिल्लू आरजीने सोडले खरे. मात्र, त्यानंतर काही तासांतच आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आरजी हा भाजपाचाच 'ट्रॅप' असल्याचा आरोप करत तिन्ही अटी फेटाळण्यात आल्या. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास राहिले असतानाच आरजीने जागा वाटपाबाबत दिलेल्या प्रस्तावाने काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष चक्रावले.

म्हादई नदीवरील कर्नाटकचा कळसा-भंडुरा प्रकल्प मोडीत काढणार असल्याचे काँग्रेसने राष्ट्रीय जाहीरनाम्यात घोषित करावे, गोव्यात सरकारी व कोमुनिदाद जमिनींमधील परप्रांतीयांच्या झोपड्या पाडणार व त्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करणार, असे काँग्रेसने राज्य जाहीरनाम्यात घोषित करावे आणि भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी 'पोगो' विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशा तीन अटी आरजीने घातल्या होत्या व काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती.

काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक काल सायंकाळी फातोर्डा येथे झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकोस्ता, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, उद्धवसेनेचे गोवा प्रमुख जितेश कामत आदी उपस्थित होते.

या बैठकीत पुढील रणनीतीबरोबरच आरजीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. सर्वांनी या अटी अमान्य केल्या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, आरजी पक्षाने इंडिया आघाडीला अशा प्रकारच्या अटी घालणे हा त्यांच्या राजकीय स्टंट आहे. 

इंडिया आघाडीच्या वतीने श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर, उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप हे दुपारी १२:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे सांगण्यात आले. अर्ज दाखल करताना काँग्रेस, आपचे आमदार व इंडिया आघाडीतील सर्व नेते उपस्थित रहाणार आहेत असे सांगण्यात आले.

संयुक्त बैठकीत प्रचाराची पुढील दिशा ठरविण्यात आली. यात घरोघरी प्रचार, कोपरा बैठका घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

काय म्हणाले होते मनोज परब?

सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी तीन अटी ठेवताना काँग्रेस व इंडिया आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांनी मान्य केल्या तरच आम्ही जागा वाटपाबाबत वाटाघाटीसाठी चर्चेला येऊ, असे सांगितले. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पैकी एक जागा आरजीला द्यावी किंवा दोन्ही जागा आरजीने लढवाव्यात किंवा दोन्ही जागा इंडिया आघाडीने लढवाव्यात, याबाबत अटी मान्य केल्यानंतरच चर्चेला सुरुवात होईल,' असे म्हटले होते. इंडिया आघाडीतील घटक हे गोवा आणि गोमंतकीयांचे अस्तित्व राखण्यासाठी एकत्र आले असल्याचे सतत सांगत असतात. आरजीवर भाजपाची 'बी' टीम असल्याचा आरोप केला जातो. जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे परब यांनी म्हटले होते. आमचे दोन्ही लोकसभा उमेदवार निवडून आल्यास आम्ही इंडिया आघाडीलाच पाठिंबा देणार आहोत, हे आम्ही आधीच जाहीर केलेले आहे, असेही परब यांनी म्हटले होते.

आरजी हा भाजपाचाच 'ट्रॅप'

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'आरजी हा भाजपानेच लावलेला ट्रॅप आहे. यात आम्ही अडकणार नाही. म्हादई तंटा लवाद काँग्रेस सत्तेवर असतानाच स्थापन झाला. 'पोगो' विधेयक विधानसभेत नामंजूर झालेले आहे. आरजीच्या कोणत्याही अटी मान्य करण्यासारख्या नाहीत. - माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस.

६ महिन्यांपूर्वी काँग्रेसला सांगितले

दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना तिकीट द्या, असे सहा महिन्यांपूर्वी मी काँग्रेस श्रेष्ठींना सांगितले होते, बाणावली येथे जाहीर सभेत ते म्हणाले की, जात, धर्म विसरुन सर्वांनी विरियातो यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही गोवा फॉरवर्ड रमाकांत खलप यांच्या मागे ठामपणे राहणार आहेत. - आमदार विजय सरदेसाई
 

Web Title: india alliance parties meeting for goa lok sabha election 2024 includes congress goa forward aap ncp sharad pawar group shiv sena thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.