मूळ गोमंतकीय पाक नागरिकाला भारतीय नागरिकत्व; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 10:05 AM2024-12-11T10:05:29+5:302024-12-11T10:06:18+5:30
'सीएए'चा राज्यातील दुसरा लाभार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) शेन सेबेस्त्याव परैरा या मूळ गोवेकर, परंतु पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी पर्वरी येथे मंत्रालयात नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू व अन्य अधिकारी उपस्थित होते.
शेन सेबेस्त्याव परैरा विवाहित असून गेली ४३ वर्षे ते भारतीय नागरिकत्त्व मिळवण्यासाठी धडपडत होते. त्याचे पालक पाकिस्तानमध्ये स्थायिक होते. शेन पत्नी व तीन लहान मुलांसह डिमेलोवाडा, हणजूण येथे राहतात. वरील कायद्याखाली भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा पाकमधील ते दुसरा गोवेकर ठरले आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये अन्य एक ख्रिस्ती पाक नागरिक, जो मूळ गोवेकर आहे, त्याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील खिस्ती, हिंदू व शीख जे मूळ भारतीय आहेत, परंतु काही कारणामुळे त्यांना त्या देशांचे नागरिकत्व पत्करावे लागले, त्यांनी अर्ज केल्यास त्यांनाही भारतीय नागरिकत्व दिले जाईल. अनेक अर्ज सध्या विचाराधीन आहेत.
४३ वर्षे तिष्ठत होतो : शेन परेरा
दरम्यान, मनोगत व्यक्त करताना शेन परेरा यांचा चेहरा खुलला होता. पाकिस्तानमध्ये जन्मानंतर चार दशकांपूर्वी ते भारतात स्थलांतरित झाले. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात पूर्ण झाले. ते राज्यात दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत. काल भारतीय नागरिकत्त्व बहाल करण्याच्या कार्यक्रमास त्यांची पत्नी व तीन लहान मुलेही उपस्थित होती. शेन परेरा यांनी सांगितले, मी गेली ४३ वर्षे भारतीय नागरिकत्वासाठी तिष्ठत होतो. आता मला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे.