लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जीत आरोलकर हे 'लापीट' आहेत, असा शब्दप्रयोग विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केल्यानंतर जीतचा अपमान झाला, अशी पेडणे तालुक्यातील जीत समर्थकांची व कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. याबाबत कार्यकर्ते संतापले असून त्यांनी निषेधाच्या कार्यक्रमांची आखणी सुरू केली आहे. युरी आलेमाव यांना जाब विचारणार, असे जीत यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले असून त्याचे पडसाद येत्या काही दिवसांत उमटल्याचे पहायला मिळेल.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रविवारी मांद्रेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही अपमानाची कल्पना दिली असल्याचे काहीजणांनी सांगितले. 'लोकमत'ने जीत यांना प्रतिक्रिया विचारली असता युरी यांनी वापरलेला शब्द अतिशय आक्षेपार्ह आहे, असे आरोलकर म्हणाले. केवळ एकदा नव्हे तर तीनवेळा युरी यांनी 'लापीट' हा शब्द वापरला. पेडणेच्या संस्कृतीला व एकूणच गोव्याच्या संस्कृतीला अशा प्रकारचा शब्द वापरणे शोभत नाही, हे युरी यांना ठाऊक नसावे. यापूर्वी गोव्यात अनेक विरोधी पक्षनेते झाले. पण कुणीच कधी दुसऱ्या आमदारास 'लापीट'सारखा आक्षेपार्ह शब्द वापरला नव्हता. युरी यांना लोक जाब विचारतील,' असे आरोलकर म्हणाले.
दरम्यान, मांद्रे व एकूणच पेडण्यातील आरोलकर समर्थक संतप्त झाले असून वाद वाढण्याची चिन्हे आहेत, याची कल्पना काही भाजप नेत्यांनाही आली आहे. युरी यांनी अजून पेडणे तालुक्याचा दौरा केलेला नाही. भंडारी समाजातील युवा कार्यकर्त्यांमध्येही जीत यांना मानाचे स्थान असून भंडारी युवा कार्यकर्ते आता काय करतील याकडे काँग्रेसच्या काहीजणांचे लक्ष आहे