पणजी: गोवा विद्यापीठाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना जेवणात किडे सापडले होते, या पार्श्वभूमीवर गोवा एनएसयूआयतर्फे सोमवारी सचिवालयात शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची भेट घेत यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनामार्फत केली आहे. एनएसयूआय राज्य प्रमुख नौशाद चौधरी यांच्या नेतृत्वखालील एनएसयूआय शिष्टमंडळाने लोलयेकर यांना निवेदन सादर केले.
गोवा विद्यापीठाच्या मेसच्या जेवणात अनेकदा विद्यार्थ्यांना किडे, किंवा मेलेल्या माश्या सापडल्या आहेत. याबाबत गोवा विद्यापीठाच्या रजिस्ट्रारकडे तक्रार देखील करण्यात आली, परंतु आतापर्यंत काहीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे, त्यांनी देखील हे कळताच आश्चर्य व्यक्त केले, तसेच या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर हा विषय सोडविण्यावर भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती नौशाद चौधरी यांनी यावेळी दिली.
गोवा विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे, ते देखील सरकार नीट चालवू शकलेले नाही. देशातील अव्वल १०० विद्यापीठांमध्ये देखील गोवा विद्यापीठ येत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. राज्यातील विविध भागातील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येतात, होस्टेलमध्ये राहतात. राज्या बाहेरील व देशाबाहेरील विद्यार्थी येथे असतात. पण येथील जर जेवण्याची व्यवस्था नीट नसेल तर याचा उपयोग काय? जेवणात किडे सापडले हा गंभीर विषय असून, विद्यापीठाचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. हे त्वरित थांबले पाहिजे, तसेच मेसच्या कंत्रादारांवर कारवाई होणे आवश्यक आहे, असे चौधरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले.