लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'नोकरी विक्री घोटाळा हा आजकालचा घोटाळा नसून गेली दहा वर्षे हे कांड सुरू होते', अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार के यांनी दिली आहे. हा घोटाळा कित्येक कोटींचा असल्याचेही तपासात आढळून आले आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी महासंचालक आलोक कुमार यांनी अधिकाऱ्यांसह पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, दक्षिण गोवा अधीक्षक सुनीता सावंत यांनी या घोटाळ्यांसंबंधी सविस्तर माहिती दिली.
महासंचालक आलोक कुमार म्हणाले, 'आतापर्यंत राज्यातील विविध पोलिस स्थानकांत मिळून एकूण ३९ लोकांविरुद्ध २९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३३ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली पोलिस स्थानकांत मिळून एकूण ३९ आहे, तर अजून काही संशयित बेपत्ता आहेत. त्यांचा शोध चालू आहे. ९४ जणांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे.
या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असल्यामुळे आणि विविध पोलिस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात हा तपास वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून होत असल्यामुळे हे प्रकरण स्वतंत्र तपास एजन्सीकडे द्यायला पाहिजे, असा आग्रह अनेक लोक करीत असले तरी पोलिस महासंचालक कुमार यांनी ही शक्यता फेटाळली. ते म्हणाले, 'तपास योग्य पद्धतीने चालू आहे.'
राजकारण्यांना फसवण्यासाठी नावे घेतली
'आतापर्यंत जी प्रकरणे नोंद झाली आहेत, त्या सर्व प्रकरणात योग्य पद्धतीने आणि गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकीय लागेबांधे आढळून आलेले नाही, असे अधीक्षक सुनीता सावंत आणि अक्षत कौशल यांनी सांगितले. राजकारण्यांची नावे जर कुणी घेतली असतील तर ती लोकांना फसविण्यासाठीच घेतली असावीत,' असेही डीजीपी कुमार यांनी सांगितले.
सोने, वाहने जप्त
नोकरी विक्री प्रकरणाशी संबंधित तपासात पोलिसांनी ११६ ग्रॅम सोनेही जप्त केल्याची माहिती अधीक्षक कौशल यांनी दिली. प्रिया यादव नामक संशयिताने रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन या प्रकरणात अनेकांना फसविल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबरच २ मिनीबस आणि १२ कार जप्त करण्यात आल्या आहेत.
...तसे पुरावे नाहीत
सरकारी नोकरीसाठी आमिष दाखवणाऱ्या आरोपींनी कोणाला नोकरी दिल्याचे कुठलेच पुरावे नाहीत. सर्व प्रकरणांचा तपास माझ्यासह पोलिस महानिरीक्षकांच्या देखरेखीखाली योग्य मानि सुरू आहे असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले. तर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात आरोपी व पीडित एकमेकांच्या संपर्कात आले. सरकारमधील प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क असल्याचे खोटे सांगून आरोपींनी लोकांना फसवले. आरोपींवर विश्वास ठेवून रोखीने देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
..असे गुन्हे दाखल
या प्रकरणात डिचोलीत ५, वास्को, पणजीत ४ (प्रत्येकी), फोंडा, आगशी ३ (प्रत्येकी), पर्वरी, म्हार्दोळ, काणकोण २ (प्रत्येकी), जुने गोवे, म्हापसा, कोलवाळ, मडगाव १ (प्रत्येकी).
निष्पक्ष तपासाला का घाबरता? विरोधकांचा सवाल
नोकरी विक्री प्रकरणात जर कुणीही राजकारणी सहभागी नाहीत तर या प्रकरणाचा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून निष्पक्ष तपास करण्यास सरकार का घाबरते ? असा सवाल काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या 'या प्रकरणात निष्पक्ष चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांकडून तपास करून घ्यावा ही काँग्रेसची मागणी आजही आहे का ? असे विचारले असता गिरीश चोडणकर ते म्हणाले, 'लोकांना सत्य हे कळायलाच पाहिजे. त्यामुळे तपासाचा केवळ फार्स न करता अत्यंत गांभीर्याने या प्रकरणाची चौकशी केली जावी. त्यासाठी न्यायालयीन चौकशी करणेच योग्य ठरणार आहे. कारण हे १० वर्षे जुने प्रकरण आहे. मागील बारा वर्षे भाजपचीच सत्ता राज्यात आहे. त्यामुळे हे सरकार या घोटाळ्याला जबाबदार ठरते,' असेही ते म्हणाले.
'पोलिस सरकारचा राग आळवतात'
नोकरी विक्री प्रकरणात राजकारण्यांचा संबंध नाही असे जाहीर करून गोवा पोलिसांनी खात्याचे नैतिक अधःपतन केले' असा आरोप आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केला. ते म्हणाले, 'पूर्वी गोवा पोलिस इतक्या खालच्या पातळीवर कधीच उतरले नव्हते.
'तपास योग्य दिशेने'
नोकरी घोटाळा प्रकरणाचा सखोल तपास होणार आणि तो योग्य दिशेने होत आहे, असे पंचायतमंत्री आहे माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, बोगस नोकरी विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झालाच पाहिजे. या प्रकरणामुळे सरकार आणि मंत्र्यांची बदनामी होत आहे. आपल्या नावेही अनेक बोगस ऑडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण धसास लागून सत्य बाहेर यायलाच पाहिजे.