कर्नाटकचे प्रत्युत्तर; गोव्याची मासळी अडविल्याने निर्यात ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 09:05 PM2018-11-19T21:05:18+5:302018-11-19T21:06:29+5:30
ट्रॉलरमालक आरोग्यमंत्र्यांना भेटले
पणजी : गोवा सरकारने आयात मासळीवर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात गोव्याची मासळीवाहू वाहने अडविण्याचे प्रकार गेल्या चार-पाच दिवसात घडले. यामुळे गोव्यातून खास करुन केरळमध्ये होणारी मासळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. गोव्यातील ट्रॉलरमालकांच्या शिष्टमंडळाने आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेतली आणि या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली.
स्वत: ट्रॉलरमालक असलेले आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा हेही या शिष्टमंडळासोबत होते. आरोग्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सिल्वेरा म्हणाले की, ‘गोवा सरकारने फॉर्मेलिन वादाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आयात होणाऱ्या मासळीवर निर्बंध घातल्यानंतर गोव्यातून शेजारी राज्यांमध्ये जाणारी मासळी कर्नाटकात अडविण्याचे प्रकार घडले आहेत. गोव्यात ‘बाळें’, ‘हाडें’, ‘ट्युना फिश’ तसेच अन्य काही प्रकारची मासळी लोक खात नाहीत. मात्र, या मासळीला केरळच्या बाजारात मागणी आहे. त्यामुळे गोव्यातून ही मासळी तेथे पाठवली जाते.
सिल्वेरा म्हणाले की, ‘गोव्यातून मासळी घेऊन जाणारे ट्रक कर्नाटकात अडविले गेल्याने ट्रॉलरमालकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. निर्यात पूर्णपणे बंद झाल्यास मच्छिमारांना जाळ्यात मिळालेली मासळी पुन: समुद्रात किंवा नद्यांमध्ये फेकावी लागेल.’ ते पुढे म्हणाले की, ‘आयात मासळीवर सरकारने घातलेल्या निर्बंधांबाबत आमचे काही म्हणणे नाही. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे हे आम्हालाही कळते. परंतु त्याचबरोबर निर्यातही ठप्प झालेली आहे, त्यावर तोडगा काढावा.
दरम्यान, आरोग्यमंत्री राणे यांनी या प्रतिनिधीला सांगितले की, ‘शिष्टमंडळ मला भेटले. परंतु कोणत्याही परिस्थितीत आयातीवरील निर्बंध उठविणार नाही. निर्यातीच्या बाबतीत जी समस्या निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा काढू.’
कर्नाटकचे शिष्टमंडळही गोव्यात
दरम्यान, दुसरीकडे कर्नाटकातील मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने आयातबंदी शिथिल करण्याच्या मागणीसाठी गोव्याचे मच्छिमारीमंत्री विनोद पालयेंकर यांची भेट घेतली. गोव्याच्या हद्दीवर सरसकट सर्वच मासळीवाहू वाहने अडविली जात असल्याची तक्रार त्यांनी मंत्र्यांकडे केली.
कर्नाटकातून येणारी मासळीची सरसकट सर्वच वाहने गोव्याच्या हद्दीवर अडविण्यात येत असल्याने कारवार, उडुपी, मंगळूर भागातील मासळी व्यापाऱ्यांवर संकट ओढवले आहे. ऑल इंडिया फिशरमेन्स काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार यु. आर. सभापथी यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेऊन मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली. मंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
सभापथी म्हणाले की, ‘ या प्रश्नावर कर्नाटकचे मंत्री व्यंकटराव नाडगौडा हेही मंत्री पालयेंकर यांच्याशी बोलले आहेत. कारवारपासून उडुपी, मंगळूरुपर्यंतची मासळी गोव्यात सहा तासात पोचते. त्यामुळे या मासळीला कोणी फॉर्मेलिन लावण्याचा प्रश्नच नाही. राज्य सरकारने इन्सुलेटेड वाहनांची सक्ती केली आहे ती लहान व्यापाऱ्यांना परवडणारी नाही. पाच ते सहा तासात मासळी गोव्यात पोचते त्यामुळे ती ताजीच असते. हवे तर कर्नाटकची मासळी राज्य सरकारच्या यंत्रणेने आवर्जुन तपासावी, असे ते म्हणाले.
कर्नाटकच्या किनारपट्टीतून रोज सुमारे दीड लाख टन मासळी गोव्यात पाठवली जाते, अशी माहिती सभापथी यानी एका प्रश्नावर दिली. ऑल इंडिया फिशरमेन्स काँग्रेसचे उपाध्यक्ष पीरु साहेब व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.