लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त आयोजित होमकुंडासंदर्भात सोशल मीडियावर एका तरुणीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर काल म्हापशात देवीच्या भक्तांचा जनक्षोभ उसळला. त्या तरुणीला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत देवीच्या धोंडांनी व भक्तगणांनी म्हापसा पोलिस स्थानकावर मोर्चा काढला. यावेळी तरुणीला अटक न केल्यास अस्नोडा येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्या तरुणीने एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमुळे मंगळवार, १४ रोजी भाविकांनी एकत्रित येऊन संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून घेतला होता. या प्रकारानंतर संशयित तरुणीच्या आईने आपली मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा करून भक्तगणांची जाहीर माफी मागितली होती. तसेच ती पोस्टही हटवली. मात्र, ती तरुणी अल्पवयीन नसल्याचा दावा करून तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी करत मंगळवारी भक्तांनी पोलिस स्थानकावर धडक दिली.
यावेळी भक्तगणांना मुख्य प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालयेकर यांची भेट घेतली. यामध्ये उपेंद्र गावकर, प्रवीण आसोलकर, अॅड. सुधीर कांदोळकर, गणेश गावकर, भगवान हरमलकर यांचा त्यात समावेश होता.
'धारगळकर हिला राज्यातून हद्दपार करा'
देवीचे भाविक तसेच धोंडांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान करून त्यांच्या भावना दुखवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां श्रेया धारगळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. तसेच त्यांना राज्यातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी भक्तांकडून करण्यात आली.
'ती' वांलकिणीला
या शिष्टमंडळाने पोलिसांसोबत चर्चा करून त्या तरुणीला अटक करण्याची मागणी केली. भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या त्या तरुणीला वालंकिणीला जाण्यास पोलिसांकडून देण्यात आलेल्या परवानगीवरही आक्षेप घेण्यात आला.
आम्ही शांत बसणार नाही
या पोस्टमुळे भक्तांच्या भावना दुखावल्याने तिला अटक करावी, अशी एकच मागणी केल्याचे उपेंद्र गावकर म्हणाले. या मागणीवर न्यायालयाशी पत्रव्यवहार करून परवानगी मागितली जाणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून भक्तांना देण्यात आले आहे. पण, मागणी पूर्ण होईपर्यंत स्वस्त न बसण्याचा इशारा देण्यात आला.
आईकडून माफी, पण...
भक्तगणांच्या तक्रारीनंतर तरुणीच्या आईने आपली मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा करून जाहीर माफी मागितली होती. तसेच ती पोस्टही हटवली. मात्र, ती तरुणी अल्पवयीन नसल्याचा दावा करून तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी करत भक्तांनी पोलिस स्थानकावर धडक दिली.
४०० भाविकांवर गुन्हा दाखल
श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान व समितीविरोधात श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर हिने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर देवीच्या भक्तांनी संशयितांच्या अटकेसाठी महामार्ग अडविला, याप्रकरणी आता कुंकळ्ळी पोलिसांनी ४०० भाविकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
१९ मे रोजी श्रेया धारगळकर व इतर संशयितांना अटक करावी यासाठी कुंकळ्ळीतील शेकडो भाविकांनी कुंकळ्ळी पोलिस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग ६६ अडवून ठेवला. त्यामुळे अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी भाविकांविरोधात दंगल माजवणे, सार्वजनिक रस्त्यावर अडवणूक करणे, जमाव करून दंगल माजविणे तसेच राष्ट्रीय हमरस्ता कायद्याच्या कलम ८ (ब) खाली गुन्हा नोंद केला आहे.