ब्रिटनमधील लॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटनावर दूरगामी परिणाम अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 03:04 PM2020-12-24T15:04:51+5:302020-12-24T15:05:06+5:30

पर्यटन व्यावसायिक चिंतेत; चार्टर विमाने सुरू होण्याची आशा मावळली

lockdown in Britain is expected to have far reaching effects on tourism in Goa | ब्रिटनमधील लॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटनावर दूरगामी परिणाम अपेक्षित

ब्रिटनमधील लॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटनावर दूरगामी परिणाम अपेक्षित

Next

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: भारतातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे असे वाटू लागल्याने आंतरराष्ट्रीय विमाने सुरू होणार या अपेक्षेत असलेल्या गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडे ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूने मोडले आहे. या नव्या घडामोडीमुळे देशातील विमानतळ चार्टर विमानासाठी खुले होण्याच्या आशा पूर्णतः मावळल्या आहेत.

' जानेवारी पासून विमानतळ चार्टर विमानांना खुले होतील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण या नव्या घडामोडीमुळे ही शक्यता पूर्णपणे नष्ट झाली आहे', अशी प्रतिक्रिया पर्यटन उद्योजक सावियो मासाईस यांनी व्यक्त केली.

ब्रिटिश पर्यटकांसाठी गोवा हे आवडीचे ठिकाण असून दरवर्षी गोव्यात सर्वात जास्त विदेशी पर्यटक ब्रिटनमधूनच येत असतात. हे पर्यटक महिना महिना येथे ठाण मांडून रहात असल्यामुळे गोव्याचे पर्यटन पूर्णतः ब्रिटिश चार्टर पर्यटकांवरच अवलंबून असते.

मासाईस म्हणाले, 'ज्यावेळी थॉमस कुक ही एजन्सी चालू होती त्यावेळी पर्यटन हंगामात दर आठवड्याला 10 ते 15 चार्टर विमाने ब्रिटनहुन गोव्यात यायची . थॉमस कुक बंद पडल्यावर हे प्रमाण दर आठवड्याला 5 विमाने एव्हढे खाली उतरले तरी इतर विमानातून ब्रिटिश पर्यटक गोव्यात यायचे. मात्र यंदा हे सर्व कोरोनामुळे बंद झाले.'

आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील आघाडीची एजन्सी असलेल्या सीटा ट्रॅव्हल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अर्नेस्ट डायस म्हणाले, ' या नव्या विषाणूने ब्रिटनमधून चार्टर विमाने सुरू होण्याच्या सर्व आशा आता संपल्या असून , या मोसमात ब्रिटिश पर्यटक गोव्यात येणे आता शक्य नाही.' 

यामुळे सरकारने निदान रशियन चार्टर विमाने गोव्यात आणण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरू झाली आहे. गोव्यात ब्रिटिश पर्यटका पाठोपाठ रशियन पर्यटक येत असतात. मागच्या शनिवारी एका रोड शोच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहसंचालक रूपींदर ब्रार त्यांची ट्रॅव्हल अँड टुरिजम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी)चे अध्यक्ष निलेश शहा यांनी भेट घेऊन ही मागणी केली होती . केंद्र सरकारने 'ट्रॅव्हल बबल' योजनेखाली निदान रशियन विमाने तरी गोव्यात येण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण जोपर्यंत गृह मंत्रालय हा निर्णय घेत नाही तोपर्यंत काही होणे कठीण याची कल्पना ब्रार यांनी या उद्योजकांना दिली होती .

मासाईस म्हणाले, रशियात कोरोना लस लोकांना दिली गेली आहे. शिवाय या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेकही त्यामानाने कमी असल्याने या पर्यटकाना आणण्यास परवानगी देण्यास हरकत नाही.

दोन महिन्यांपूर्वी रशियन चार्टर ऑपरेटनी गोव्यात येण्याविषयी इच्छा दाखविली होती. मागच्या दोन वर्षात मे महिन्यातही रशियन पर्यटक गोव्यात आले होते. जर जानेवारी महिन्यात विमानतळ खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तर या मोसमातील शेवटच्या  एका महिन्यासाठी तरी हे पर्यटक गोव्यात येतील अशी अपेक्षा व्यावसायिक करत आहेत.

Web Title: lockdown in Britain is expected to have far reaching effects on tourism in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.