पणजी : राज्यातील खनिज खाण घोटाळा प्रकरणी जबाबदार धरून गोवा फाऊंडेशन ह्या संस्थेने आपल्या काही समर्थक आंदोलकांना सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी खाण खात्याच्या पणजीतील मुख्यालयाला कुलूप लावण्याची कृती केली. या नव्या कुलूपाची चावी गोवा फाऊंडेशनचे क्लॉड अल्वारीस आणि अन्य पदाधिकारी व कार्यकत्र्यानी पणजी पोलिसांकडे सुपूर्द केली.गोवा फाऊंडेशन संस्था बेकायदा खनिज खाणींविरुद्ध सातत्याने आंदोलने करत आली आहे व न्यायालयीन लढाईही लढत आली आहे. अल्वारीस यांनी शनिवारी प्रथम आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाने खनिज लिज रद्दचा आदेश दिल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी लोटला पण सरकारने कायदेशीर पद्धतीने खाणी सुरू करण्यासाठी या तीन महिन्यांत काहीही केले नाही. कोणतीही योजना सरकारने तयार केलेली नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करू, असे सरकार सांगत आहे, असे क्लॉड अल्वारीस म्हणाले. तीन मंत्र्यांची समिती ही काहीच कामाची नाही. ती केवळ शोभेपुरती आहे. खनिज लिज रद्दचा आदेश गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. गेल्या तीन महिन्यांत सरकार खाणी सुरू करण्याबाबत योजनाच तयार करू शकले नाही. सरकारला यापुढे आम्हीच योजना सादर करू. यासाठी आम्ही ट्रक मालक व बार्ज मालकांशी चर्चा सुरू करणार आहोत. त्या घटकांना आम्ही आमच्यासोबत घेऊ व कायदेशीर पद्धतीने खाणी सुरू करण्याचा मार्ग खुला करू, असे अल्वारीस यांनी सांगितले.खाणींचा लिलाव नको सरकारने खनिज खाणींचा लिलाव पुकारू नये. त्याऐवजी सरकारने खनिज विकास महामंडळ स्थापन करावे आणि महामंडळामार्फत खाणी चालवाव्यात अशी मागणी अल्वारीस यांनी केली. महामंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही नव्याने करत आहोत. कारण सरकार लिलाव पुकारूच शकणार नाही हे गेल्या तीन महिन्यांत कळून आले आहे, असे अल्वारीस म्हणाले. लिज क्षेत्रत अजुनही 10 दशलक्ष टन खनिज माल पडून आहे. हा माल सरकारचा आहे. सरकारने त्याचा ई-लिलाव पुकारावा व महसुल प्राप्त करावा. या मालाच्या वाहतुकीचे काम ट्रक मालक व बार्ज मालकांना मिळेल. सरकारने दोनशे कोटींचा मिनरल फंड हा खाणपट्टय़ातील लोकांच्या हितासाठी वापरावा. ज्या खाण कंपन्या कामगारांना सेवेतून कमी करत आहेत, त्यांचा आम्ही निषेध करतो. खाणपट्टय़ातील लोकांना पाण्याचा पुरवठा होणो गरजेचे आहे, असे अल्वारीस म्हणाले.यावेळी आझाद मैदानावर अल्वारीस यांच्यासोबत पीडीएविरोधी आंदोलकही उपस्थित होते. या सर्वानी मिळून खाण खात्याकडे धाव घेतली व मिनेङिास ब्रागांझा इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या खाण खात्याला कुलूप ठोकले. काल शनिवार असल्याने खाण खात्याचे मुख्यालय बंद होते. तथापि, दार ओढून घेतलेले असले तरी,आत सुरक्षा रक्षक होते. त्यांना बाहेर बोलाविले गेले. ते बाहेर आल्यानंतर अल्वारीस यांच्या हस्ते खाण खात्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले गेले. 65 हजार कोटींच्या खाण घोटाळ्य़ाला खाण खात्याचे अधिकारी जबाबदार असून त्यांना तुरूंगात टाकले जावे, तसेच खाण खाते काही कामच करत नसल्याने हे खाते कायमचे बंद केले जावे, अशी मागणी अल्वारीस व इतरांनी केली. आंदोलक मग पणजी पोलिस स्थानकावर गेले व तिथे पोलिसांकडे चावी सुपुर्द केली गेली.
खाण खात्याला आंदोलकांकडून कुलूप, चावी पोलिसांकडे सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 6:34 PM