महाराष्ट्र-गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेले तिळारी धरण भरले 98 टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 11:49 AM2017-10-11T11:49:04+5:302017-10-11T11:49:27+5:30
महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के आहे.
म्हापसा - महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के असल्याची माहिती तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता रमेश दाकटुले यांनी दिली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता दूर झाली आहे.
धरणात एकूण ४४७.२ दशलक्ष घन मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने तसेच मागील काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षमतेपर्यंत भरल्याचे ते म्हणाले. धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. तिळारी प्रकल्पातून गोव्याला ७३.३ टक्के तर महाराष्ट्राला २६.७ टक्के पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो.
परिसरात जास्त प्रमाणावर पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला नाही; पण पावसाळ््यात अचानकपणे पाऊस वाढल्यास धरण भरण्याची शक्यता असते त्यामुळे ठरावीक कालावधीत पाणी बाहेर सोडावे लागते. या वर्षी सुद्धा पावसाळ्यात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात आल्याची माहिती रमेश दाकटुले यांनी दिली. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा पुढील वर्षी पावसाळा सुरु होईपर्यंत मुबलक असा आहे.
पावसाळ्याचा हंगाम संपल्यात जमा असला तरी आॅक्टोबरच्या शेवटीपर्यंत पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असतात. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे शक्य होत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात कालव्यांची दुरुस्ती हाती घ्यावयाची असल्याने अंदाजीत दिड महिन्यासाठी दोन्ही राज्यांना धरणातून होणारा पुरवठा बंद ठेवण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबराच्या शेवटी धरणातून पुरवठा सुरु करण्यात येत असतो.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागा बरोबर उत्तर गोव्यातील बार्देस, पेडणे तसेच डिचोली हे तीन तालुके या धरणावर अवलंबून आहेत. गोव्यात कृषी सिंचना बरोबर उत्तर गोव्यातील अस्नोडा तसेच चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला यातून पुरवठा होत असतो. या जलशुद्धीकरण प्रकल्पातून लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ज्या काळात तिळारी धरणातून पुरवठा बंद असतो त्या काळात जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते.