राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी
आगामी काळात आपला देश सशक्त, समर्थ राखण्यासाठी इथल्या निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करून आपल्याला शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे; परंतु, या बाबीकडे कानाडोळा करून जंगले, जलस्रोत, जैविक संपदा यांच्या अस्तित्वाची साधी दखल न घेता आपण जेथे बारमाही वाहणारे नदी नाले आहेत, त्यांचे पाणी सागराशी एकरूप होऊन क्षारता नियंत्रित राहावी म्हणून प्रयत्न न करता, त्यांना धरणांच्या साखळीत बंदिस्त करण्यात धन्यता मानत आहोत. निसर्गाने निर्माण केलेले नदी-नाले, वृक्षवेली, पशुपक्षी यांच्या अस्तित्वाला पूरक आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून, त्यांना शेकडो मैल वळवण्यासाठी धरणांचे प्रकल्प उभारण्यावर भर देत आहोत. महाराष्ट्र सरकारच्या दक्षिण रत्नागिरी पाटबंधारे विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात विर्डी धरणांतर्गत कामकाज सुरू करताना जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांनी विर्डीतले पाणी दोडामार्ग तालुक्यातल्या वझरे, माटणे, आंई येथील औद्योगिक आस्थापनांबरोबर गृहबांधणी प्रकल्पांसाठी वापरण्याचे ठरवले. उन्हाळ्याचे आगमन होण्यापूर्वी ज्या गावात पिण्याचे पाणी, जलसिंचनाची सुविधा मिळणे दुरापास्त होते, त्या गावातल्या लोकांच्या मूलभूत गरजांकडे कानाडोळा करून म्हादई खोऱ्यातले पाणी तिळारी खोऱ्यात नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नरत आहे. लवादाने महाराष्ट्राला म्हादई खोऱ्यात पाणी वापरण्यास मुभा दिलेली आहे.
आपण जेथे धरणांची उभारणी करत आहोत आणि त्यामुळे जलाशयाची निर्मिती होणार आहे, तेथील परिस्थितीचा कोणताच विचार न करता, महाराष्ट्राने धरणाच्या उभारणीबरोबर पाणी वळवून जलविद्युत निर्मिती करता येईल याची चाचपणी करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय आणि नियोजन आयोगाकडून रितसर ना हरकत दाखले न घेता त्यांनी कामाला सुरुवात केली होती. विर्डीत धरण उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने सध्या त्या परिसरात किती पर्जन्यवृष्टी होत आहे, तेथील भूगर्भात पाणी धारण करण्याची क्षमता किती आहे, अशा पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात धरण उभारणे कितपत योग्य आहे. धरणाच्या जलाशयात गरज असलेले पाणी कुठून येणार आदी बाबींचा काडीमात्र विचार न करता, गोव्याच्या हिताला प्राधान्य न देता महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम पुढे रेटून जंगल आणि पर्यावरणाच्या विध्वंसाची परिसीमा गाठली आहे.
८५७ मीटर उंचीच्या कुकमी टेंब, ८०६ मीटर उंचीच्या माणी टेंबासारख्या सह्याद्री परिसरातल्या पर्वत शिखरांबरोबर लावकी डोंगर, गौरा डोंगरावर मान्सूनमध्ये कोसळणारे पाणी विर्डीच्या दिशेने येते. काटलाचो हरल पालसकलचा हरल, उसपाच्या वाटेवरचा हरल, सवयहून येणारी ओसरेची न्हंय, लावकी डोंगरावरून येणारा पोवळाचा हरल आदी विर्डीतले जलस्रोत पावसाळी मौसमात तुडुंब पाणी कवेत घेऊन वाहतात. वावळ्याच्या सावडीचा वझरासखल, नाणीकाट, नारगी, कोगदी, हणजुणे सीमेवरचा पानशी केळावडे-विड सीमेवरचा गवरा, शिरोली सीमेवरचा माड्याचो डोंगर या परिसरातले पावसाळी पाणी चोर्ला घाटमाथ्यावरून आंबेखोलला उगम पावणाऱ्या हलतरा म्हणजेच विर्डीच्या थोरल्या न्हंयला सशक्त करायचे; परंतु, आज कर्नाटक सरकारने घाटमाथ्यावरच्या चोर्ला गावात ७.७९५ मीटर उंची आणि ७२.८० मीटर लांबी असलेल्या हलतरा धरणाची उभारणी करण्याचे योजिले असल्याने तेथून १४३ मीटर उंचीवरून खाली कोसळणाऱ्या थोरल्या न्हंयची मौसमी उपनदी असणाऱ्या कट्टीका नाल्यावर उभारलेल्या विर्डी धरणाचे कामकाज महाराष्ट्र सरकारने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी खटाटोप आरंभला आहे. धरणाची उभारणी करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने येथे अस्तित्वात असलेली पस्तर रेखाचित्रे आणि या परिसरातल्या सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय वारशाच्या संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जंगलतोड आरंभली. स्फोटकांचा गैरवापर करून दगडफोड केली. त्यामुळे या परिसराचा विध्वंस सुरू झाला. जेथून ओसरेची न्हंय पावसाळ्यात वाहते तेथील चोण्यार या जागी झेबु, रानकुत्रा आदी प्रस्तर चित्रांचा वारसा होता. नवाश्म युगात राहणाऱ्या आदिम जमातींनी ही प्रस्तर चित्रे कोरली असावी. धरणासाठी जेव्हा खडीची गरज निर्माण झाली तेव्हा प्रस्तर रेखाचित्रांनीयुक्त दगड स्फोटकाचा वापर करून ध्वस्त केले. आज विर्डी आणि शिरोली सीमेवरील पावलाच्या कोणीच्या उजव्या बाजूची प्रस्तर चित्रेच इथल्या पुरातत्त्वीय वारशाची प्रचिती देतात.
विर्डी गावात शेकडो वर्षांपासून मेशे या आदिम जमातीची वस्ती असल्याचे संदर्भ आढळतात. मेशांबरोबर विर्डीत कालांतराने क्षात्रधर्मीय घाडवसकराची लोकवस्ती निर्माण झाली. मेशे त्यावेळी संख्येने जास्त होते. त्यांनी इथल्या घाडवसकराच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी आंतरजातीय विवाहाला प्राणपणाने विरोध केला जायचा. विर्डी गावात घाडवसकराचे संख्याबळ मेशाच्या तुलनेत अत्यल्प होते, म्हणून त्यांनी त्यावेळी तांबोळीहून विर्डीत स्थायिक झालेल्या आणि झर्मे-कोपार्डेवासीयांशी बंधुत्वाचे संबंध असलेल्या सातेरकराकडे या धर्मसंकटाला तोंड देण्यासाठी मदतीचा हात मागितला. विर्डीतल्या घाडवसकर आणि सातेरकरांनी षड्यंत्र रचून मेशांचे समूळ उच्चाटन केले आणि गावात वर्चस्व प्रस्थापित केले. मेशांच्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या शिडबाच्या मळावर आज विर्डी धरण उभे होत आहे.
येथील ओसरीच्या न्हंयचा कट्टीका नाला या धरण प्रकल्पासाठी बळी गेला. विर्डी गावात एकेकाळी गौराची, शिळाची, सांबळ्याची, मोदाची, पिश्याची, देवाची अशा देवराया कष्टकऱ्यांच्या पर्यावरणीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाची प्रचिती देत होत्या; परंतु, गोव्यातल्या लाकूड व्यापाऱ्यांचा विळखा गावाला पडल्याने हळूहळू करत विडींच्या हिरवाईचा विध्वंस मांडला गेला. कांदबरीकार चंद्रकांत महादेव गावस यांच्या 'इदवास' कादंबरीने जंगल तोडीबरोबरच सांस्कृतिक हासपर्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडवले. या विध्वंसाच्या सत्रापाठोपाठ विर्डीत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या धरण आणि भुयारी बोगद्यांच्या प्रकल्पाने ही परिस्थिती आणखी भयावह केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या जलसिंचन खात्यात गेल्या अर्धशतकापासून मिळेल तिथल्या गोड्या पाण्याचा मागचा पुढचा विचार न करता उपसा करणाऱ्या मंडळींचा भरणा असल्याने, देशात सर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या या राज्याला वर्तमान आणि आगामी काळात पाण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागणार आहे. विर्डीत विविध ठिकाणी आणखी धरण प्रकल्प उभारून हे पाणी वळवून नेण्याचे प्रस्ताव मूर्त स्वरूपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओरबाडून पाणी उपसा करण्याच्या मानसिकतेत बदल करून जलस्रोतांच्या जलसंचय आणि जंगल क्षेत्राचे संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य दिले तर ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"