२४ तासातील तापमानात मोठा फरक, आरोग्याच्या समस्यांची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 10:46 PM2018-02-05T22:46:35+5:302018-02-05T22:48:03+5:30
पणजी - राज्यात पुन्हा एकदा तापमान खाली जात असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात १७ अंश सेल्सीएस म्हणजेच किमान तापमानापेक्षा दुप्पट फरक जाणवू लागला आहे. २४ तासातील या मोठ्या चढउतारामुळे आरोग्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत.
मागील चार दिवसांपासून किमान तापमान हे १८ ते १८.५ एवढे खाली जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही ते खाली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव वाढला आहे. सोमवारी दुपारी ११ वाजेपर्यंत हवेत गारवा जाणवत होता. परंतु नंतर दीड दोनच्या सुमारास तापमान खूपच तापले. किमान तापमान १८.५ तर कमाल तापमान ३५.५ एवढे नोंद झाले आहे. एकाच दिवसात १७ अंश सेल्सीएस एवढा फरक जाणवून आला. ही परिस्थिती मागील चार दिवसांपासून असून चोविस तासात १५ ते १७ अंश सेल्सीएस असा फरक जाणवत आहे. या फरकामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषत: लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, कफ या सारखा उपद्रव होण्याचा संभव अधिक असल्याची माहिती प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ विरेंद्र गावकर यांनी दिली. कमी तापमानात संसर्गजन्य रोगांचाही अधिक फैलाव होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गोमेकॉतही बाल रुग्ण विभागाच्या ओपीडीत या दिवसात गर्दी उसळळत आहे. सर्दी खोकला, ताप अशाच बहुतेकांच्या समस्या आहेत. बदलत्या तापमानाचाही तो परिणाम असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.