मणिपुरी अतिरेक्यांचा मला ठार मारण्याचा डाव होता
By admin | Published: May 22, 2015 02:34 AM2015-05-22T02:34:06+5:302015-05-22T02:35:01+5:30
पणजी : ‘मणिपूरमध्ये काम करीत असताना मणिपुरी अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डाव रचला होता,’ अशी धक्कादायक माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
पणजी : ‘मणिपूरमध्ये काम करीत असताना मणिपुरी अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डाव रचला होता,’ अशी धक्कादायक माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी येथे उघड केली आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉँग्रेस हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमात फालेरो यांनी ही माहिती दिली. मणिपूरमध्ये आपण कॉँग्रेस पक्षाचे काम करीत असताना अतिरेक्यांचा धोका पत्करून काम करणे भाग होते. आपल्यावर मणिपूरची जबाबदारी हायकमांडने दिल्यामुळे आपण ती अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्या ठिकाणी काम करीत असताना अतिरेक्यांनी आपल्याला ठार मारण्याचा डावही रचला होता,
असे त्यांनी सांगितले.
या कटाचे नंतर काय झाले व ते कसे बचावले इतर माहिती त्यांनी सांगितली नाही; परंतु कॉँग्रेस पक्षाचे काम किती जोखीम घेऊन आपण व आपल्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केले होते, याची प्रचीती त्यांनी या घटनेचा उल्लेख करून दिली.
राजीव गांधी यांनी दहशतवादाविरोधीचा लढा यशस्वी पद्धतीने लढला होता. मिझोरामसारख्या ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया त्यांच्याच प्रयत्नांमुळे बंद झाल्या आणि त्यांच्याच प्रेरणेने मणिपूर व इतर ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांविरोधी लढा कॉँग्रेसने चालविल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपने काश्मीरमध्ये पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या मुफ्ती महम्मद सईद यांच्याशी सलगी करून आपल्याला सत्तेपुढे राष्ट्रहिताची किंमत नसल्याचे दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो व इतर नेते उपस्थित होते.
(प्रतिनिधी)