यामिनी मडकईकर
फोंडा : राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये मानकुराद आंबा मागील काही दिवसांपासून दाखल होऊ लागला आहे. मागील काही काही दिवसांपूर्वी ३ हजार ते २५०० रुपयांचा दर हाेता. आता १५०० ते १२०० रु. डझन असा दर आहे. त्यामुळे काही ग्राहक आंबा खरेदीकडे वळले आहेत.
सध्या फोंड्यात चांगल्या दर्जाचा व मोठ्या आकाराचा आंबा १५०० रुपये डझन, तर मध्यम १२०० रु. डझन अशा प्रकारे विकला जात आहे. सध्या फोंडा बाजारपेठेत मानकुराद आंब्याबरोबर काही विक्रेत्यांकडे हापूस आंबा दाखल झाला असून, ४०० रुपये किलो, तर मल्लिका आंबा ३०० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.
अनेकांचा आवडता मानकुराद आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला नसून, येत्या काही दिवसांत मानकुरादचा पुरवठा आणखी वाढणार आहे. सध्या मानकुरादचे वाढलेले दर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे अनेकांच्या खिशाला आंबा न पडणारा झाला आहे. त्यामुळे काही ग्राहक दर कधी कमी होईल, याची प्रतीक्षा करत आहेत.
याविषयी विक्रेत्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून मानकुराद दाखल होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी आंब्याचे दर तीन हजारपर्यंत पोहोचले होते. मात्र, सध्या काही ग्रामीण भागातून मानकुराद उपलब्ध होऊ लागल्यामुळे दर किंचित कमी होत चालले आहेत. एप्रिल, मे पर्यंत आंब्याचे दर आणखी कमी होतील.