मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ नावापुढे 'न्यू गोवा' नको; तक्रारीची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:42 AM2023-04-05T08:42:27+5:302023-04-05T08:43:35+5:30
'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव घोषित केल्यानंतरही 'न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट' असा उल्लेख केला जात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावापुढे 'न्यू गोवा'चा उल्लेख करता येणार नसल्याचे पत्र नागरी उड्डाण खात्याचे संचालक सुरेश शानभोगे यांनी जीएमआर कंपनीचे सीईओ आर. वी सेशन यांना पाठविले आहे. 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव घोषित केल्यानंतरही 'न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट' असा उल्लेख केला जात होता.
यासंबंधी स्थानिक युवक ज्ञानेश्वर वरक यांनी ई-मेलद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, गोवा राज्य प्राधिकरण मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन अखेर 'न्यू गोवा' हे नाव 'मनोहर' नावाच्या पूर्वी किंवा नंतर वापरता येणार नाही. फक्त 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' याच नावाने उल्लेख केला जाईल, असे शानभोगे यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनावेळी 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव दिले होते. त्यानंतर दि. ४ जानेवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावाला अधिकृतरित्या मान्यता दिली होती; परंतु जीएमआर कंपनीकडून 'न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट' नाव वापरले जात होते. ज्ञानेश्वर वरक यांनी यासंदर्भात ई-मेल द्वारे तक्रार केली होती. सरकारसोबत केलेल्या कराराचे कंपनीकडून उल्लंघन होत असल्याचे वरक यांनी तक्रारीत नमूद केले होते. आता महामार्गालगत लावण्यात आलेल्या फलकांवरील नाव बदलावे लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"