लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवारातर्फे कला संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने तबला गुरू पं. मारुती कुर्डीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जाणारा १५वे पंडित मारुती कुर्डीकर संगीत संमेलन रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे. त्यानिमित्त सकाळी ९:३० ते रात्री ८ पर्यंत पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) सभागृहात हा कार्यक्रम होईल.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. अनिश प्रधान यांचे तबला एकलवादन (सोलो) हे संमेलनाचे खास आकर्षण असेल. सकाळी ९:४० वा प्रमुख पाहुणे कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब व संगीतप्रेमी उद्योजक दिलीप धारवाडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील.
यावेळी ज्येष्ठ तबलावादक नितीन कोरगावकर यांचा सत्कार करण्यात येईल. गायन वादनाच्या मैफलीत सकाळच्या सत्रात विद्देश च्यारी व बाळकृष्ण खांडेपारकर यांचे तबला एकलवादन व पं. विनायक हेगडे यांचे शास्त्रीय गायन होईल. संध्याकाळच्या सत्रात दादा परब यांचे पखवाज एकलवादन, मालिनी च्यारी यांचे हार्मोनियम एकलवादन होईल व पं. अनिश प्रधान यांच्या तबला एकलवादनाने समारोप होईल. प्रेमानंद आमोणकर, दत्तराज म्हाळशी. बाळकृष्ण नाईक साथसंगत करतील.