'गाव आणि गवे' संघर्ष गोव्यात पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:45 PM2018-09-22T15:45:18+5:302018-09-22T15:45:52+5:30

गव्याच्या हल्ल्य़ात कावरे -पिर्ला येथे एक ठार; शिकारीच्या फासात अडकल्यामुळे गवा गंभीर जखमी

Men v/s Bison, conflict again on rise in goa | 'गाव आणि गवे' संघर्ष गोव्यात पुन्हा ऐरणीवर

'गाव आणि गवे' संघर्ष गोव्यात पुन्हा ऐरणीवर

googlenewsNext

 सुशांत कुंकळयेकर
मडगाव :  मडगावपासून 25 किमी अंतरावर असलेल्या कावरे- पिर्ला या गावात गवा रेड्याने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाला असून त्यामुळे ‘गाव आणि गवे’ यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही तिसरी घटना असून, गव्यांच्या अधिवासात माणसांकडून झालेले अतिक्रमण हेच त्यामागचे मुख्य कारण समजले जात आहे. 


 दक्षिण गोव्यातील ही घटना बुधवारी झाली होती. रानात गेलेली गुरे परत आणण्यासाठी कावरे पिर्ला येथील पंढरी गावकर हा 65 वर्षीय वृध्द रानात गेला असता गव्याने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्य़ात तो ठार झाला. गुरुवारी त्याचा मृतदेह सापडला होता.
हा गवा रानडुकरांच्या  शिकारीसाठी लावलेल्या काटेरी फासात अडकल्याने गंभीर जखमी झाला होता. पायाला लोखंडी सळई अडकलेल्या स्थितीत तो फिरत होता. अशा अवस्थेत असताना त्याच्यासमोर पंढरी गावकर हा इसम आल्याने त्याने त्याच्यावर हल्ला केला.

 
 दक्षिण गोव्याचे उपवनपाल अनिल शेटगावकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, सदर जखमी गवा वनखात्याच्या पथकाला सापडला होता. त्याला बेशुध्द करण्याचा प्रयत्नही आम्ही केला. मात्र गुंगीचे इंजेक्शन त्याला व्यवस्थित लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न व्यर्थ गेला. 


  गोव्यात या पूर्वी सत्तरी भागात  गव्याने गावात येऊन हल्ला केल्यामुळे दोघांना मृत्यू आला होता. त्यानंतर अशा हल्ल्य़ात  माणसाचा प्राण गमावण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे अशा गव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय योजना केली जावी. तसेच गव्यांना उपद्रवी प्राणी घोषित करुन त्यांना ठार मारण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी सध्या होऊ लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने प्राणी प्रेमींकडून या मागणीला विरोध होत आहे. 


  गोव्यातील आघाडीचे पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते रमेश गावस यांनी या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना माणसांच्या उपद्रवामुळे गवे त्रस्त झाले आहेत असे म्हटले. उत्तर गोव्यात जे दोन हल्ले झाले त्या मागचे नेमके कारण अदय़ाप स्पष्ट झालेले नसले तरी सत्तरी व वाळपई या भागात मोठय़ा प्रमाणावर स्फोटकांचा वापर करुन डोंगर फोडले जातात. त्यामुळे या आवाजाला घाबरुन गवे गावात येऊ लागले आहेत असे मत गावस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,  वाळपईजवळ गांजे या गावात अशाच प्रकारची एक खडीची खाण आहे जी जवळ जवळ बोंडला अभयारण्य क्षेत्रला चिकटून आहे.  अशा अभयारण्य क्षेत्रात जर असे प्रकार झाल्यास गवे गावात येणार नाहीत तर कुठे असा प्रश्न त्यांनी केला.


 ज्या कावरे - पिर्ला  या गावात  ही तिसरी घटना घडली आहे तेथेही अर्निबंधित  खनिज उत्खनन  होऊन  रानातील डोंगरावर  पन्नास ते शंभर मिटर खोल खडडे तयार झाले आहेत. अशा खडडय़ात पडून कित्येक गवे ठार झाले आहेत.  या खाणीमुळेच गवे आता गावात येऊ लागले आहेत, अशी माहिती या गावातील लोकांनी दिली. दोन वर्षांपूर्वी याच कावरे गावात मोटरसायकलने जाणाऱ्या माको बावदाने या युवकावर गव्याने हल्ला केल्यामुळे तो जागीच ठार झाला होता. याचीही आठवण यावेळी करुन दिली. 


  पर्यावरण कार्यकर्ते  गावस म्हणाले, फोंडा तालुक्यातील बेतकी- माशेल या गावात कित्येक वेळा गव्यांचे थवे येत असतात. ते पुढे वरगावपर्यंत जात असतात.  मात्र, या गव्यानी कधीही माणसावर हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. बोंडला अभयारण्य क्षेत्रात रहाणाऱ्या लोकांवरही कधी गव्यांनी हल्ला केलेला नाही. जोपर्यंत गवा जखमी होत नाही किंवा  घाबरुन बिथरुन जात नाही तोपर्यंत  तो हल्ला करत नाही. कावरे पिर्ला येथे झालेला हल्ला जखमीअवस्थेतील गव्याकडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यात ज्या दोन घटना झाल्या त्यामागेही अशीच काही कारणे असण्याची शक्यता आहे.  गव्यांवर नियंत्रण आणण्यापेक्षा त्यांना बिथरावून सोडणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण येण्याची गरज त्यानी व्यक्त केली. 
 

Web Title: Men v/s Bison, conflict again on rise in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.