पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हल्लीच वास्को येऊन सभेला संबोधित करून गेले, पण त्यांच्या भाषणात वास्को किंवा दक्षिण गोव्यातील एकही विषय दिसला नाही. ते केवळ स्वतःचेच गुणगान गाऊन गेले. लोकांच्या कुठल्याच विषयावरून त्यांनी ठोस कुठलेच आश्वासन दिले नाही. केवळ आपल्याला पाहून मते द्या, असाच काहीसा त्यांचा सूर होता, असा आरोप समाजसेविका तारा केरकर यांनी केला.
दक्षिण गोव्यातील पंतप्रधानाच्या भाषणात कोळसा प्रकल्प, डबल ट्रॅकिंग, वेस्टर्न इंडिया, गोवा शिपयार्ड या गोष्टीचा समावेश असणे अपेक्षित होता. पण असे झालेच नाही. मोदी केवळ आपलीच गॅरंटी देण्यात व्यस्त राहिले. राज्याची जीवनदायिनी म्हादाई बाबत देखील त्यांनी एक शब्द उच्चारला नाही. स्थानिक नेत्यांनीही मोदींवर दबाव टाकला नाही. यावरून स्पष्ट होते की भाजप सरकारला राज्याचे हिताचे काहीच पडलेले नाही. भाजप सरकार भविष्यातील गोवा नष्ट करण्याच्या वाटेवर आहे, असे केरकर यांनी सांगितले.
मोदी आपलेच कारनामे सांगण्यास एवढे व्यस्त होते की त्यांनी स्वतःच्या पक्षातील उमेदवारांना देखील नीटपणे लोकांसमोर मांडले नाही. व्यासपीठावर मोदींनी आपल्या उमेदवारांना दुर्लक्षित केले. इतर नेते जे उपस्थित होते त्यांनी देखील मोदींना कुठल्याच समस्या सांगितल्या नाही. निदान स्थानिक आमदार संकल्प अमोणकर यांच्याकडून काही अपेक्षा होत्या, पण अमोणकर जे काँग्रेसमध्ये असताना स्पष्ट बोलण्याची तयारी ठेवायचे ते देखील काहीच बोलले नाही. यावरून आता दिसू लागले आहे की मोदींची गॅरंटी निदान गोव्यात तरी चालणार नाही, असेही केरकर यांनी पुढे सांगितले.