वास्को: मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाऱ्या कोळशामुळे होणारे कोळसा प्रदुषण आणि अवजड वाहतूकीमुळे होणारे धूळ प्रदुषण रोखून जनतेला होणारा त्रास त्वरित दूर करण्याचे आश्वासन आम्हाला मुरगाव पोर्ट अथोरोटीचे (एमपीए) चेअरमन डॉ. विनोदकुमार नायर यांनी दिले आहे. रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ जास्त असलेल्या वेळेत अवजड वाहतूक होत असल्याने अनेकदा अपघाताचा धोका निर्माण होत असून भविष्यात तो धोका दूर करण्यासाठी एमपीए रस्त्यावर जास्त वाहतूक होत असलेल्या वेळेत अवजड वाहतूक सोडणार नसल्याचा आदेश शुक्रवारी (दि.१) संध्याकाळपर्यंत जारी करणार असल्याची माहीती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली.
काही दिवसापूर्वी मुरगाव नगरपालिकेच्या नगरसेवकांनी कोळसा आणि धूळ प्रदुषणाचा विषय चर्चेत आणला होता. तसेच काही नगरसेवकांनी मुरगावच्या आमदारांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी उचित पावले उचलवावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कोळसा आणि धूळ प्रदुषणाचा त्रास रोखण्यासाठी आपण एमपीए चेअरमनला भेटणार असल्याचे सांगून त्यात नगरसेवकांनी यावे असे आमंत्रण दिले होते. एमपीए चेअरमनला भेटण्याची तारीख आमदारांनी जाहीर केली होती.
शुक्रवारी (दि.१) एमपीए चेअरमनला भेटण्याचे निश्चित झाल्याने सकाळी आमदार संकल्प आमोणकर यांनी सडा येथील त्यांच्या कार्यालयासमोर काहीवेळ नगरसेवकांची प्रतिक्षा केली. मात्र नगरसेविका श्रद्धा आमोणकर वगळता अन्य नगरसेवक आले नाहीत. त्यानंतर आमदार संकल्प आमोणकर त्यांच्या समर्थकांबरोबर एमपीएच्या कार्यालयात जाऊन त्यांनी चेअरमन डॉ. विनोदकुमार नायर यांची भेट घेतली. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाऱ्या कोळशामुळे होणारे प्रदुषणाच्या विषयावर सुमारे १ तास १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर आमदार आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही एमपीए चेअरमनला तुमचा हेतू काय आहे असा सवाल उपस्थित केल्याचे सांगितले.
एमपीए प्रदुषण रोखण्यासाठी उचित पावले न उचलता अशाच प्रकारे लोकांना त्रास देत राहील का असा सवाल त्यांना विचारण्यात आल्याचे आमोणकर यांनी सांगितले. चेअमनरशी झालेल्या बैठकीवेळी त्यांनी कोळसा आणि धूळ प्रदुषण रोखण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. तसेच कशाप्रकारे कोळसा आणि धूळ प्रदुषण रोखणार त्याचा कारवाई अहवालसुद्धा मला सादर करण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त धूळ प्रदुषण रोखण्यासाठी मशिन आणि कामगाराद्वारे सकाळी आणि रात्री रस्त्यावर स्वच्छता करण्यात येणार असल्याचे आश्वासन चेअरमन यांनी दिल्याचे सांगितले. त्या व्यतिरिक्त सकाळी ७ ते ९, दुपारी १२ ते २ आणि संध्याकाळी अवजड वाहनांची (ट्रक इत्यादी) वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश मुरगाव पोर्ट अथोरेटी जारी करणार असल्याचे आश्वासन चेअरमननी दिल्याची माहीती आमोणकर यांनी दिली.
कोळसा प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी यापूर्वी मुरगाव मतदारसंघातील माजी आमदाराने कधीच आवाज उठवला नाही. मी पुढाकार घेतल्यानंतर कोळसा प्रदुषण रोखण्यासठी उचित पावले उचलण्याचे एमपीए कडून आश्वासन मिळाल्याचे आमोणकर यांनी सांगितले. मुरगाव पालिकेतील नगरसेवकांनी कोळसा प्रदुषणाचा विषय काढल्यानंतर मी पुढाकार घेतला असता ते माझ्याबरोबर का आले नाही असा सवाल आमोणकर यांनी उपस्थित केला. कोळसा प्रदुषणाची समस्या दूर व्हावी यासाठी एमपीए चेअरमनला मी भेटण्यासाठी गेलो, त्यावेळी नगरसेवक न येण्यामागे त्यांचा लपलेले हेतू तर नाही ना असा संशय आमोणकर यांनी निर्माण केला. आमदार आमोणकर आणि एमपीए चेअरमनच्या झालेल्या बैठकीवेळी त्यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक तुळशीदास खवणेकर, शांताराम पराडकर आणि नगरसेविका श्रद्धा आमोणकर उपस्थित होत्या.