आरोग्य खात्यातील बाहुबली; एकाचवेळी कोरोनासह मलेरिया, डेंग्यूला रोखण्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:19 PM2020-06-09T21:19:18+5:302020-06-09T21:19:26+5:30

सर्व परिस्थितीत ते सर्वच  प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ अधिकारी त्यांना थट्टेने बाहुबलीही म्हणतात. 

Multipurpose health worker in goa working to curb corona dengue malaria | आरोग्य खात्यातील बाहुबली; एकाचवेळी कोरोनासह मलेरिया, डेंग्यूला रोखण्याची जबाबदारी

आरोग्य खात्यातील बाहुबली; एकाचवेळी कोरोनासह मलेरिया, डेंग्यूला रोखण्याची जबाबदारी

googlenewsNext

- वासुदेव पागी 

पणजी : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर गोव्यातील सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनाशी मुकाबला या एककलमी कार्यक्रमाखाली सर्वशक्ती पणाला लावून खपत असताना एकाचवेळी कोरोना रोखण्याचे काम आणि  डेंग्यू, मलेरिया  व इतर रोगांना रोखण्यापासून मुलांच्या लसीकरणाचीही कामे नित्यनियमाने करणारी एक फळी खपत आहे, ती फळी आहे ‘बहुउद्देशीय आरोग्य सेवक’. सर्व परिस्थितीत ते सर्वच  प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ अधिकारी त्यांना थट्टेने बाहुबलीही म्हणतात. 

मान्सून गोव्याच्या दारात ठेपला असताना पावसाळ्य़ातील संभाव्य रोग दूर करण्यासाठी ज्या खबरदारी घ्याव्या लागतात  सर्वात महत्त्वाचे योगदान असते ते बहुउद्देशीय आरोग्य सेवकांचे. या आरोग्यसेवकातील महिला कर्मचा:यांना ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ (एएनएम) असेही म्हणतात. आरोग्य खात्याला राज्यातील  वस्तुस्थितीची  थेट माहिती देणारे हे कर्मचारी आहेत. कारण ते लोकांच्या घरोघर फिरतात. उपआरोग्य केंद्रे किंवा प्राथमिक /शहर आरोग्य केंद्रात त्यांच्या नेमणुका केल्या जातात. सर्वाधिक कर्मचारी हे राज्यातील सर्व गावात विखुरल्या गेलेल्या  उपआरोग्य केंद्रात  नेमलेले आहेत. 

लोकवस्तीच्या ठिकाणी  किंवा सार्वजनिक जागेवर एखादा टायर, बाटली किंवा करवंटीही खुली सोडली जाणार नाही याची काळजी हेच कर्मचारी घेतात. कारण त्यात पाणी साचून डास पैदास केंद्रे बनली तर नंतर मलेरिया व डेंग्यू निवारणासाठी त्यांनाच  तिप्पट, चौपट दमछाक करून खपावे लागणार याची त्यांना कल्पना असते.   लहान मुलांना नित्यनियमाने ठराविक काळानंतर करण्यात येणारे लसीकरण हे   कोविड महामारीच्या काळातही  थांबले नाही, किंवा त्यात खंड पडला नाही याचे श्रेयही याच आरोग्य सेवकांना जात आहे.  राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या सर्व योजना कार्यक्रम  हे व्यवस्थित होत आहेत तेही याच कर्मचा:यामुळे. कोरोना महामारीदरम्यान गोव्यात जेव्हा विदेशातून आलेल्या माणसांना    विमानतळावरच क्वारंटाईन करण्याची व्यवस्था नव्हती, त्यावेळी अशा लोकांना शोधून काढून त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन करण्याचे कठीण आव्हानही याच आरोग्य सेवकांमुळे आरोग्य खाते पेलू शकले. कोविड विरुद्धच्या लढय़ात हे कर्मचारी कुणी चेक नाक्यावर, कुणी रेल्वेस्थानकावर, कुणी इस्पितळात तर कुणी विमानतळावरही आपली डय़ुटी बजावीत होते. हे करीत असताना त्यांना देण्यात आलेल्या नित्याच्या कामातून त्यांना सुट्टी देण्यात आली नव्हती.  खात्याला डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया, फायलेरिया या सारख्या रोगाच्या बाधित लोकांसंबंधी, स्थलांतरित कामगार व त्यांची आरोग्य कार्डे करून घेण्यासंबंधीची  कामे त्यांनी अखंडित चालू ठेवली.  एकाचवेळी अनेक जबाबदा:या पार पाडणारे हे बहुउद्देशीय आरोग्य सेवक त्यामुळे आरोग्य खात्यातील बाहुबलीच ठरावेत.

Web Title: Multipurpose health worker in goa working to curb corona dengue malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.