लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्याला डॉ. प्रमोद सावंत यांच्या रूपाने चांगला मुख्यमंत्री लाभला आहे. गोव्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे उद्गार सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काढले. जीवनात कितीही मोठे झालात, तरीही आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये. मी अनेक भाषांतील चित्रपट केले, पण आपल्या मातृभाषेला अधिक महत्त्व देत आले आहे. युवावर्ग आज कुठेतरी भरकटताना दिसत आहे. गोव्यातील काही मुलांना मातृभाषा बोलता ये नाही. त्याला पालक जबाबदार असल्याचे मत उसगावकर यांनी व्यक्त केले.
सम्राट क्लब चोडण यांच्यातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. सम्राट क्लब सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावत असून भारतीय संस्कृती जोडण्याचे काम करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यासाठी त्यांच्या सर्व सदस्य मंडळाचे अभिनंदन असे उसगावकर म्हणाल्या.
अपेक्षित यश नाही, तरीही प्रयत्न सुरूच
गोमंतकीय लोक आपल्याला नेहमी सन्मान देत आले आहेत. तसेच कलाक्षेत्रात इच्छा असूनही अपेक्षित भरारी मारता आली नाही. लोकांच्या सहकार्याने एक दिवस मला जागतिक पुरस्कार प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे. ती तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केली.
सम्राट स्टार गरुडा पुरस्कारांचे वितरण
सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक व सम्राट क्लब चोडण आयोजित गोमंतकातील सर्व ३० क्लबांच्या प्रतिनिधीं समवेत बुधवारी सम्राट स्टार गरुडा पुरस्कारांचे वितरण साखळी येथील रवींद्र भवनाच्या सभागृहात झाला. या समारंभात एकूण १० विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोमंतकीय बॉलिवूड सिनेतारका वर्षा उसगांवकर या गौरव सोहळ्याचे खास आकर्षण होते. यावेळी सम्राट क्लब इंटरनॅशनलचे प्रतिनिधी माजी आमदार धर्मा चोडणकर, शैलेश बोरकर, दीपक नार्वेकर, रुपेश ठाणेकर व इतर उपस्थित होते. यंदाचा सम्राट जीवनगौरव पुरस्कार साखळी क्लबचे संस्थापक रवळू आमोणकर यांना उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला.
बेतकीकर यांना पुरस्कार
गोव्यातील विविध सम्राट क्लब संचालकांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याचे आले. तर काहींचा उत्कृष्ट उल्लेखनीय कामाबद्दल गौरव करण्यात आला. यात साखळीतील आंतरराष्ट्रीय सम्राट क्लब विशेष पुरस्कार चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते क्लबच्या अध्यक्ष मोनाली बेतकीकर यांना दिला.