गोव्यात नव्याने होणार व्याघ्रगणना, पर्यावरणप्रेमींमध्ये उत्कंठा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 01:01 PM2018-01-08T13:01:16+5:302018-01-08T13:01:39+5:30
गोव्यात येत्या महिन्यापासून नव्याने व्याघ्रगणना होणार आहे.
पणजी : गोव्यात येत्या महिन्यापासून नव्याने व्याघ्रगणना होणार आहे. गोव्याच्या जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्त्व आहे, असा जो दावा पर्यावरणप्रेमींकडून होत आहे त्याला या गणनेतून पुष्टी मिळते का याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणातर्फे १८ राज्यांमध्ये २0१८ची व्याघ्रगणना होणार आहे. या सर्वेक्षणासाठी जंगलांमध्ये कॅमेऱ्यांचा वापर केला जाईल.
गोव्याच्या जंगलात वाघ इतर भागातून आले की येथेच त्यांचा राबिता आहे, हेही या सर्वेक्षणातून स्पष्ट होईल. ५0 वाघांची संख्या आढळल्यास संबंधित जंगलक्षेत्र हे वाघांचा निवास असलेले हॅबिटेट मानले जाते. गोव्याला कर्नाटक व महाराष्ट्र या शेजारी राज्यांची जेगल हद्द आहे. या शिवाय दोडामार्ग, राधानगरी अभयारण्य आदी भाग वाघ संवर्धन युनिट मानले जातात.
एप्रिल २0१७ मध्ये गोव्याच्या जंगलात पाच वाघ आढळून आले होते. यात दोन नर जातीचे, दोन मादी जातीच्या तर दोन वाघांचे बछडे आढळून आले होते. २00२ साली राज्यात प्रथम वाघांचे अस्तित्त्व दिसून आले. म्हादई अभयारण्यात राज्य वन खात्याने केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले. त्यानंतर २00६ आणि २0१0 च्या सर्वेक्षणातही या भागात वाघांचे अस्तित्त्व दिसून आले.
जंगलात कॅमेरे लावून छायाचित्रे टिपण्याची आधुनिक पध्दत अवलंबण्यात येत आहे. एप्रिल २0१३ मध्ये गोव्याच्या म्हादई खोºयात डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात येणाऱ्या वन क्षेत्रात वाघीण आढळून आली होती तर जानेवारी आणि मार्च २0१४ मध्ये वाघ आणि वाघिणीचे अस्तित्त्व आढळून आले होते. नव्याने होणाऱ्या सर्वेक्षणाबद्दल पर्यावरणप्रेमींमध्येही उत्कंठा आहे.