राज्यसभेसाठी गोव्यातून तानावडेच शक्य; मुख्यमंत्र्यांसह अनेकांची नावाला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:43 AM2023-05-29T10:43:39+5:302023-05-29T10:46:41+5:30
तेंडुलकर यांचा कालावधी येत्या ५० दिवसांत संपणार
पणजी: राज्यसभेवर जाण्यासाठी यावेळी गोव्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाच संधी मिळेल, असे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची व बहुतेक मंत्र्यांची तानावडे यांच्याच नावाला मान्यता आहे, अशी माहिती काल प्राप्त झाली. विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांचा राज्यसभेवरील कालावधी येत्या ५० दिवसांत संपुष्टात येणार आहे.
भाजपला यावेळी नेता गोव्यातून दुसऱ्यांदा आपला राज्यसभेवर पाठवण्याची संधी मिळणार आहे. पहिली संधी सहा वर्षांपूर्वी तेंडुलकर यांनी घेतली. तेंडुलकर यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून अगोदर काम केले. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे हयात होते व भाजपमध्ये सक्रिय होते तेव्हा पर्रीकर यांनीच तेंडुलकर यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाला सूचवले होते.
आता विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांनी सदानंद तानावडे यांचे नाव राज्यसभेसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सूचविले असल्याची माहिती मिळाली आहे. तानावडे यांनी भाजपचे सरचिटणीस व मग प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभेची निवडणूक जिंकली. झेडपी, पंचायत, पालिका निवडणुकांमध्येही पक्षाला यश मिळाल्याने तानावडे यांची वर्णी राज्यसभेवर लागू शकते.
कवळेकर यांनाही इच्छा पण....
मंत्री विश्वजीत राणे यांच्यासह बहुतेक मंत्र्यांनी तानावडे यांचेच नाव राज्यसभेसाठी दिल्लीतील नेत्यांना सूचविले आहे. भाजपकडे गोव्यात सर्वाधिक आमदार आहेत. शिवाय मगो पक्षासह काही अपक्षांचा सहभाग भाजप सरकारमध्ये आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक ही गोव्यात एकतर्फीच होणार आहे. माजी मंत्री बाबू कवळेकर यांना देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याची चर्चा भाजपच्या आतिल वर्तुळात आहे. अजून कवळेकर यांनी जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केलेली नाही. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचेही नाव काहीजण चर्चेत आणतात.