सत्तेच्या काळात काँग्रेसकडून फक्त घोटाळे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 10:41 AM2024-03-14T10:41:05+5:302024-03-14T10:42:38+5:30
पंचवीस वर्षांत देश कसा हवा, यासाठी पंतप्रधानांनी मागवल्या सूचना.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : भाजप सरकार नेमके लोकांना हवे तेच देण्याचा प्रयत्न करते. काँग्रेसने आपल्या सत्तेच्या काळात फक्त घोटाळे केले. तर आम्ही लोकांना हवे ते प्रकल्प उभे करून दाखवले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव मतदारांसमोर केले.
फर्मागुडी येथील नमो नव मतदार संमेलनात ते बोलत होते. कृषी मंत्री रवी नाईक, एन.आर. आय आयुक्त नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी, पी. ई. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिसुर्लेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, आज जे युवक आहे ते कदाचित उद्या लोकप्रतिनिधी बनतील. विकसित भारतासाठी आज तुम्ही ज्या सूचना देत आहात त्यांना त्या वेळी फळे आलेली तुम्ही नक्की पहाल. त्यावेळी तुम्हाला तुमचा स्वतःचा अभिमान वाटेल, असे काम पुढच्या पंचवीस वर्षांत नरेंद्र मोदीचे स्वप्न करून दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवकांच्या स्वप्नातील देश घडवायचा आहे. पुढच्या पंचवीस वर्षात देश कसा हवा, यासाठी त्यांनी युवकांकडून सूचना मागितल्या आहेत.
काँग्रेसच्या काळात दर दिवशी विविध खात्यांचे फक्त घोटाळेच लोकांसमोर यायचे. त्याच्या उलट मागच्या दहा वर्षात एक तरी आर्थिक घोटाळा झाल्याचे उदाहरण दाखवून द्या. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज काढणाऱ्या लोकांचे खच्चीकरण कसे झाले, हे सुद्धा आम्ही पाहिले आहे. आम्ही फक्त नवे प्रकल्प व नवे संकल्प यांच्या उभारणीसाठीच प्रयत्न करत आहोत. भारतात फक्त साडेतीनशे वैद्यकीय महाविद्यालये होती. आज दहा वर्षांतच हा आकडा ७०० च्या बाहेर गेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे काम या दहा वर्षात घडले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांप्रती नरेंद्र मोदी यांना आदर आहे म्हणूनच त्यांनी अन्यायकारक असा तीन तलाकचा कायदा मोडीत काढला, असेही मनोगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
दहा वर्षांत हाताला काम देण्याचे कार्य
कॉंग्रेसने लोकांना फक्त हात दाखवण्याचे काम केले. तर त्या हाताला काम देण्याचे काम या दहा वर्षात कौशल्य विकास व इतर तत्सम कार्यक्रमांच्या अनुषंगाने झाले आहे. नव्या शैक्षणिक धोरण पासून एक नवीन शैक्षणिक क्रांती सुद्धा घडत आहे. मागच्या ४० वर्षात नवीन शैक्षणिक धोरणाकडे सरकारने पाठ फिरवली होती. आगामी वर्षापासून गोव्यात आम्ही द्विपदवी संकल्पना राबवण्यास सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमांतर्गत एकाच वेळी डिग्री व डिप्लोमा घेण्याची संधी युवकांना मिळेल.